गावकी : दुधाचा धंदा मंजी डोस्क्याला ताण; अन फकस्त उप्सावं लागत्याय श्याण..!

“ओ चेरमन, कधी यायचा दुधाला बाजार..? आवं कधीबी काहिबी होऊंद्या.. ते सगळ्यात आंधी शेतकऱ्याच्याच बोकांडी बसणार. टोळधाड म्हणू नगा, पाऊस म्हणू नगा, ऊन म्हणू नका, रोगाट म्हणू नका, मंदी म्हणू नगा.. अन च्यायला इकूनतिकून दुधाला चांगला बाजार आलता तर लगीच कोरोना आला.. डायरेक बोकांडी बसला.. झालं.. आले बाजार पार सत्राव-अठराव..” मल्हारी अण्णा वैतागून म्हणत व्हता.

डेअरीवर दूध घालून दोन कॅन सायकलला अडकवून चालताचालता अण्णा गप्पा हानीत होते. सखाराम खेडकर होताच जोडीला. नेहमीसारखाच.. तर, तिकडून दगडूमाळी आलाच व्हता. त्यानी दूधबिध घातलं न दाटुनच तोंडाला पंचा सरकवला. पण जरा तुटाक उभा राहिला न म्हणाला, “काय मजा नाय राहिली लेकहो, पार सतराव आले बाजार..”

आता इथं मल्हारीअण्णा आधीच वैतागलेले. त्यांना चांगला जोडीदारच भेटला. “काल आंदोलन होतं म्हणत्यात काय झालं त्याचं..? म्हून नुसतं घाईघाई सकाळीच येऊन दूध घातलं सगळ्यांनी”, असं त्यांनी म्हणल्यान चर्चा सुरू झाली.

  डेअरीसमोर रस्त्याच्या कडेला अशी मैफिल रंगती कधी कधी की काय सांगावं.. आज तशीच व्हती.. “काय नुसतं आंदोलन  करून व्हतंय, काही बदलत नसतं.. आमकी समिती बसावली, तमकी समिती बसावली च्यायला, या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याव खरी समिती बसावली.. पार वाटूळं केलं”, खेडकर त्यात म्हणाला.

  या गप्पा ऐकून चेरमन थांबले अन म्हणाले, “काय मंग काय म्हणतो अण्णा..?” त्यावर अण्णा म्हणाले, “चेअरमन अवो, बाजार कव्हा यायचा दुधाला..? काय तुमि नुसते चेरमन झाले.. भाव नीट द्या की.. नूस्त श्याण उचलतोय आम्ही..” चेरमन पण वैतागलेले. कारण मध्यंतरी एवढं सगळं कलेक्शन विकायचं कुठं हा प्रश्न होता त्याच्यासमोर. याच्या-त्याच्या भेटी गाठी घेऊघेऊ बळच त्यांनी दूध विकलं अन शेतकऱ्यांना पैसे वाटले. कोरोनामुळे अचानक खप कमी झाला आणि डेअरीच्या साखळीवर चांगलाच ताण पडला.

  “आरं या पावसापासून गपक्यास 1000 लिटर दूधच कमी झालं.. आता बघ बिटके अन्नाचं 400 तर उघड उघड हे, त्यात सोमवंशी सरपंचाचं 100 कमी झालं.. आन असं किरकोळ कारकोळ चार-पाचशे. हजार लिटर काय थोडं झालं का”, चेरमन माहिती देऊ लागले. पावसामुळे गाया व्यवस्थित खात नाहीत आणि मुख्य म्हणजे पाणी कमी पितात. त्यामुळे दूध कमी निघतं. त्यात दुधाला भाव नसल्यामुळे गायांची ठेप राहिली नाही. गोठे फक्त चालू ठेवायचे म्हणून चालू आहेत. भाव आला की पुन्हा हे कचकाऊन भुसा पेंड, बार्ली सगळं सुरू होईल. दूध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी हुकमी पैसा होता. कोरोनानी तो पण पार मातीत घातला. काही नफा निघत नाही सध्या. आंदोलनाने अजून तरी काही साध्य झालेलं नाही. त्यामुळे ह्यांच्या फ़क़्त गावगप्पा चालू हैत.. दुसरं करणार तरी काय म्हणा शेतकरी..!

  लेखक : अजिंक्य दंडवते, मो. ७७४३८१११५६ (श्रीगोंदा, जि. अहमदनगर)

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here