Netflix ची तेवीशी पूर्ण; वाढदिवसानिमित्त वाचा तुमच्या लाडक्या ब्रँडची स्टोरी

आज तुमचे लाडके नेटफलिक्स २३ वर्ष पूर्ण करत २४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. रीड हेस्टिंग्ज आणि मार्क रॅंडॉल्फ या दोघांनी मिळून Netflix कंपनीची स्थापना १९९७ मध्ये केली. DVD भाड्याने देणाऱ्या कंपनीपासून ते थेट दर्जेदार वेब सिरीज, चित्रपट, डॉक्युमेंट्री निर्माण करणारी जगातील एक महत्त्वाची कंपनी असा त्यांचा प्रवास आहे. हा प्रवास महत्त्वाचा आहे. कारण, आता जगातील पहिल्या टॉपमोस्ट १० ब्रँडमध्ये ही कंपनी आहे. 

भारतीय मनोरंजन क्षेत्रातही वेब सिरीज, चित्रपट, डॉक्युमेंट्री अशा जबरदस्त ताकद असणारा कंटेंट भारतीय रसिकांना पुरवणारी महत्वाची कंपनी म्हणून सध्याच्या घडीला Netflix कडे पाहता येईल. तरुणाईने अक्षरशः Netflix ला गणपती बाप्पा सारखे डोक्यावर घेतले आहे, मात्र कायम स्वरुपीसाठी असे म्हणायला सध्यातरी हरकत नाही..!

You Tube, TV,  Family Drama असणाऱ्या सिरीयल, पांचट फिल्मला पाहून वैतागलेला मोठा वर्ग Netflix कंपनीने स्वतःकडे खेचला आहे. ‘लै महाग आहे’, ‘आपल्याला परवडणार नाही’ असे पण म्हणायला त्यांनी जागा ठेवली नाही. कारण, चार-पाच लोकांत मिळून मेंबरशिप घेऊन दणक्यात गणपतीच्या वर्गणीसारखा जल्लोष करत पाहणे आता कोणालाही सोपं जात आहे. हा, फक्त त्यासाठी चार-पाच जिगरी मित्रांचा ग्रुप असला पाहिजे हे नक्कीच. काहीकाही दानशूर मित्र असले तरी आपण परजीवी वनस्पतीसारखे Netflix वापरू शकतो. अजिबात चोरी नाही, की कोणाला फसवल्याची भावना मनात न येऊ देताही..! 

रेडिओचे मार्केट टीव्हीने खाल्ले, मात्र टीव्हीचे पण मार्केट कोणी खाल्ले असेल तर ते Netflix आहे. कुठं मोबाईल घेऊन जावा, मोबाईलमध्ये डेटा आणि एक पॉवर बँक किंवा चार्जर सोबत असलं तरी खूप झालं. तुम्हाला कंटाळा येणार नाही इतकं दर्जेदार मटेरियल एका क्लिकवर इथे मिळतं. भारतासारख्या देशात २०१९ आणि २०२० मध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक ही Netflix कंपनीने केली. Netflix कंपनीची स्पर्धा नेमकी कोणाशी आहे या बाबतीतचं रीड हेस्टिंग्ज यांनी मांडलेले मत खूपच प्रसिद्ध आहे. ते म्हणतात “Netflix चा सर्वांत मोठा स्पर्धक हा You Tube किंवा अमेझॉन नव्हे तर, Netflix चा सर्वात मोठा स्पर्धक हा झोप आहे. आमची स्पर्धा ही माणसाच्या झोपेशी आहे. कारण माणसाचा मोकळा वेळ म्हणजे झोप, आम्ही झोपेसारख्या बलाढ्य स्पर्धकाशी लढतो आहोत..!”

लेखक : गणेश शिंदे (सरकार)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here