म्हणून त्यांना म्हणतात ‘हॉकीचे जादुगार’; देशाला मिळवून दिले होते ३ गोल्ड मेडेल..!

जगभरात फुटबॉलमध्ये पेले, तर क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांची जशी ओळख आहे, तशीच ओळख एका भारतीय खेळाडूची आहे. ती आहे हॉकी या खेळात आणि ते हॉकीचे जादुगार आहेत मेजर ध्यानचंद. होय, त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्यापूर्वी ऑलिम्पिक खेळत तब्बल ३ गोल्ड मेडेल मिळवून दिली होती. दुसऱ्या महायुद्धाने घात केला नाहीतर, त्यांचे आणखी खूप काही जागतिक रेकॉर्ड आज आपण वाचू शकलो असतो.

काहीजण जन्मजात कौशल्याचे भांडार असतात. तर, काहीजण ते शिकून घेतात नी यश मिळवतात. मात्र, या दोन्ही गुणांची खाण असलेले मात्र, विरळा असतात. सुप्रसिद्ध हॉकीपटू आणि हिकीचे जादुगार म्हणून आपण सगळे ओळखतो ते मेजर ध्यानचंद हे दोन्हींचा सुरेख संगम असलेले अवलिया होते. सैन्यात गेले तेंव्हा त्यांचा आणि हॉकी खेळाचा संबंध आला. तोपर्यंत त्यांना खेळही जास्त माहित नव्हता. परंतु, मग त्यांची जन्मजात कौशल्ये आणि सोबत चांगल्या शिकवणीने ते या खेळासाठी तयार झाले. त्यांनी जागतिक पातळीवरील सामन्यात ४०० पेक्षा जास्त गोल करून गोल मशीन म्हणून नावलौकिक मिळवला होता.

१९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक त्यांनी देशाला गोल्ड मेडेल मिळवून दिले होते. मात्र, नंतर जागतिक राजकारणात युद्धाचे मळभ दाटले. अखेर हिटलर-मुसोलिनी यांच्या वेडापायी आणि त्यांच्या समर्थकांच्यामुळे जगात दुसरे महायुद्ध झाले आणि ध्यानचंद यांच्या जागतिक स्तरावर होणाऱ्या सामन्यांच्या खेळाला ब्रेक लागला. त्यामुळेच १९३६ नंतर त्यांच्यासह अनेकांना खेळासह आणि इतर क्षेत्रातील मंडळींनाही आपल्या करिअरला ब्रेक लावावा लागला. नव्हे तो लागला.

ध्यानचंद यांनी खेळाचे मैदान आपल्या स्टाईलने गाजवले. अजूनही त्यामुळेच त्यांची आठवण आपल्या सर्वांना येते. खेळातील आनंद घेतानाच जिंकण्याचा ध्यास घेणारे मेजर ध्यानचंद यांनी मिळवलेले यश आणि त्याच्यानंतर आलेल्या खेळाडूंनी भारताला मिळवून दिलेल्या यशामुळे त्यावेळी हॉकीचे सुवर्णयुग आपण पाहिले होते. मात्र, १९६० नंतर या राष्ट्रीय खेळाला आपल्याकडे घरघर लागली. ती काही अजूनही निघण्याची चिन्हे नाहीत. यासाठी खेळाडू, त्यातील राजकारण आणि आपण हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहूनही शांत असणारे नागरिक यांच्यामुळे (बि)घडले आहे.

लेखक : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here