धक्कादायक : म्हणून ‘रिलायन्स’ला करावे लागले ‘हे’ आवाहन; ‘तयारीबहाद्दरां’ना भामट्यांनी दिले ‘असे’ आव्हान..!

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची जगभरात घोडदौड जोमात सुरू आहे. मात्र, त्याचवेळी कंपनीच्या याच गुडविलचा फायदा घेऊन गुंतवणूकदारांना फसवण्याची टोळीही सक्रीय झालेली आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद घालण्यास सुरुवात केल्याने मग अखेरीस आता रिलायन्स रिटेल यांना याची खास दखल घेऊन एक आवाहन करण्याची वेळ आली आहे. एका अर्थाने भामट्यांनी पुन्हा एकदा बाजाराला आव्हान देऊन ठगवण्यासाठी लोकप्रिय गोष्टींचा वापर केल्याचे उघड झालेले आहे.

भारतीय सर्वसामान्य माणूस अर्थात कॉमन मॅन हा म्हणायला साधाभोळा असतो. मात्र, त्यातले अनेकजण शोर्टकट मारून श्रीमंत होण्याचे स्वप्नरंजन करीत असतात. कष्ट न करताच मोठे घबाड हाती लागण्याच्या अपेक्षाने मग ते ठगांच्या जाळ्यात अलगद जाऊन अडकतात. आतापर्यंत अशी हजारो उदाहरणे घडूनही. ठगांचे काम संपलेले नाही, ना सामान्य माणसाचा हव्यास. आताही रिलायन्स जगभरात पैसे कमवीत असताना आपणही त्यामध्ये सहभागी होऊन आपला पैसा वाढवावा यासाठीची तयारी अनेकांनी केली आहे. त्याच ‘तयारीबहाद्दरां’ना फसवून आपले आर्थिक व्यवस्थापन सत्त्कारणी लावायला अनेकजण टपले आहेत. अशावेळी मग या बहाद्दरांनी आता सोशल मिडिया आणि मेसेज यांच्या माध्यमातून जाळे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यात काहीजण अडकल्याचेही समजते. अशा मंडळींनी आपले पैसे गमावले आहेत हे सांगायला कोणत्याही तज्ञांची गरज नाहीच की..!

  तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, आपणही हे वाचा आणि शेअर करा. कारण, याद्वारे आपण अनेकांना फसवणूक होण्यापासून वाचवू शकतो. जियोमार्ट (JioMart) याची फ्रेंचाइजी देण्याच्या नावाखाली ही फसवणूक सुरू झालेली आहे. गुगल, फेसबुक आणि अनेक दिग्गज कंपन्यांनी अंबानींच्या या प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे भविष्यात फ़क़्त भारतात नाही, तर जगभरात जिओचा बोलबाला असल्याची शक्यता बाजारात व्यक्त होत आहे. मात्र, जिओचे अजूनही काहीच काम सुरू झालेले नाही. पाण्यात म्हैस आणि वर मोल करण्याचा हा प्रकार आहे. बाजारात जिओला परकीय कंपन्यांचे मोठे आव्हान आहे. मात्र, स्व. धीरूभाई अंबानी यांच्या या कंपनीवर अजूनही भारतीयांचे खास प्रेम आहे. त्याच मंडळीना फसवण्याचा प्रयत्न हे सायबर माफिया अर्थात ऑनलाईन ठग करीत आहेत.

  पुढील १० वेबसाईटवर अशा पद्धतीने फसवणूक केली जात असल्याचे फायनान्शियल एक्प्रेस या अर्थपत्राने म्हटले आहे. फ़क़्त त्यांची नावे डोक्यात फिट न ठेवता अशा पद्धतीच्या इतरही काही वेबसाईट सापडल्या किंवा त्यांचा मेसेज तुम्हाला आला तर रिलायन्स रिटेल यांच्या ip.legal@ril.com या वेबसाईटवर आपणही तक्रार करून सहकार्य करू शकता असे आवाहन रिलायन्स व्यवस्थापनाने केले आहे.

  jmartfranchise.in
  jiodealership.com
  jiomartfranchises.com
  jiomartshop.info
  jiomartreliance.com
  jiomartfranchiseonline.com
  jiomartsfranchises.online
  jiomart-franchise.com
  jiomartindia.in.net
  jiomartfranchise.co

  रिलायन्स रेटल यांनी याबाबत एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टीला बळी पडून फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे. सायबर फिशिंग करणाऱ्यांच्या या कृत्याला आळा घालण्यासाठी कंपनीच्या कायदा विभागाकडे संपर्क करून अशा गोष्टी लक्षात आणून देण्याचेही आवाहन त्यात केलेले आहे.

  *ता. क. : भामट्यांच्या आमिषांना स्वतः बळी न पडतानाच आपल्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईक यांनाही अशा जाळ्यात अडकून आर्थिक नुकसान होणार नाही याची वाचकांनी काळजी घ्यावी. कष्ट करूनच या जगात पैशांसह सुख मिळू शकते. त्यामुळे वाचकांनी सायबर भामट्यांना धडा शिकवण्याच्या या कामात सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन टीम कृषीरंग आपल्यालाही करीत आहे. तसेच असे काही दुसरे प्रकारही असतील तर आम्हाला आपण प्रतिक्रियेच्या ठिकाणी याची माहिती देऊ शकता किंवा आमच्या krushirang@gmail.com या इमेलद्वारे आम्हाला ही माहिती कळवावी, ही विनंती.

  लेखन : सचिन मोहन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here