जपानी पंतप्रधानांचा असाही आदर्श; पहा कोणत्या कारणाने सोडत आहेत ते आपले पद

भारतात राजकीय सुधारणा आवश्यक आहेत असे वाटणाऱ्यांची कमतरता नाही. मात्र, अशी सुधारणा स्वतःपासून करावी लागते याचे मात्र अशा मंडळींना अजिबात सोयरसुतक नाही. जनता, राजकारणी, मतदार आणि प्रशासन असे सगळेच (बहुसंख्य) भारतीय एकाच माळेचे मनी आहेत. अशावेळी जर देशात एखादा कर्तव्यभावना दाखवणारा सुज्ञ नेता किंवा माणूस सापडला तर ती बातमी होते. मुळात अशी बातमी होण्याचे दिवस संपले तरच त्यातून खऱ्या अर्थाने मार्ग निघू शकतो. असाच मार्ग कसा असतो याची साक्ष पटवून दिली आहे ती जपान देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीने. होय, त्यांनी फ़क़्त आजारपणामुळे आपले पद सोडण्याची तयारी केली आहे.

आपल्याकडे एकदा सरपंच झाला की मग त्याला हटविणारा माई का लाल पुढेच येत नाही. असाच प्रकार बाजार समित्या, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महापालिका, आमदारकी, खासदारकी, मंत्री, मुख्यमंत्री आणि अगदी पंतप्रधान या पदाबबातही वेळोवेळी दिसतो. ‘मी पुन्हा येईन’चा जयघोष त्यामुळेच आपल्याकडील राजकीय नेते करताना दिसतात. सत्ता आणि त्याची खुर्ची म्हणजे कर्तव्य पार पडण्याचे नाही, तर चिकटून राहण्याचे ठिकाण बनले आहे. अशावेळी हीच जनता त्यांना चुका पदरात घालून संधी देते आणि वर राजकीय सुधारणा गरजेच्या असल्याच्या फेसबुकी गप्पांमध्ये रंगतेही. मात्र, याच सगळ्या प्रकारावर कोणतेही भाष्य न करता काही सुज्ञ लेकांचे देश कृतीने कर्तव्यभावना दाखवून देतात. असाच प्रकार पुन्हा एकदा जपान देशात घडत आहे. तेथील राष्ट्रीय वाहिनी एनएकके (NHK) यांनी सूत्रांच्या माहितीनुसार बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, सततच्या आजारपणामुळे देश चालवताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान शिन्जो आबे हे पद सोडणार आहेत.

आपल्याकडे दवाखान्यातुनही राज्य चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बातम्या आपण वाचल्या असतील की. इथे नाव किंवा पक्ष लिहिण्याची गरज नाही. कारण, सगळेच पक्ष एकाच माळेचे मनी आहेत. आणि जनताही त्यांच्या पाठीशी ठाम आहे. तर, मुद्दा आपल्याकडचा अहीच. मुळात आपल्या राजकीय पुढाऱ्यांना कर्तव्य काय असते याचीच जाणीव जनता होऊ देत नाही. सत्ता ही प्रशासन उत्तम करण्यासाठी नाही, तर राबवण्यासाठी असल्याचा ‘गोड’ (आणि देशासाठी एकदम कडू) गैरसमज भारतीयांचा झालेला आहे. मग भ्रष्टाचार आणि अनागोंदी कायमची राहणार की. जपानमध्ये पंतप्रधान असो की सामान्य माणूस त्यांना समान वागणूक मिळते. अगदी हॉटेलात गेल्यावरही त्यांना वेटिंग करावे लागते. न्यूझीलंड, युरोपिअन देश आणि इतरही अशी बहुसंख्य उदाहरणे देशात आहेत. मात्र, आपल्याकडे लाल दिवा गेला तरीही व्हीआयपी संस्कृती कायम आहे आणि राहीलही. कारण भारतीयांमध्ये राजेशाहीचा आणि जनता म्हणून ते पाहण्याचा अवगुण कायम आहे.

होय, असाच प्रकार जपानमध्ये होत नाही. शिन्जो आबे हे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे मेंबर आहेत. त्यांनी आजारपणामुळे हे पद सोडण्याची तयारी केल्याचे त्या पार्टीने म्हटल्याची बातमी रॉयटर्स या जागतिक वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यांचे वय 65 वर्षे असून त्यांनी आतापर्यंत ८ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. २००७ मध्येही त्यांना असेच पद सोडावे लागले होते. मात्र, पुन्हा एकदा बरे होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे काम सुरू केले होते. मात्र, आता त्यांचे एकूण वय लक्षात घेता ते पुन्हा एकदा या पदावर येतील अशी शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या या बातमीने जपानी शेअर बाजारात घसरण झाली आहे.

लेखक : सचिन मोहन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here