तर दिवाळीला होणार तेलाचे भाव कमी; पहा कोणत्या कारणाने होणार बाजारात ‘हा’ बदल

खाद्यतेलाचे भाव सध्या काहीअंशी वरच्या पट्टीत आहेत. करोना विषाणू आणि त्यामुळे जगभरातील एकूण आयात-निर्यात बाधित झालेली असतानाच केंद्र सरकारने आयात शुल्कात किरकोळ वाढ केल्याने खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत. मात्र, पुढील सणासुदीच्या कालावधीत म्हणजे दसरा व दिवाळी या कालावधीत याचे भाव कमी होण्याचे अंदाज आहेत. कारण, त्याला जागतिक मार्केटमधील काही घडामोडी कारणीभूत ठरणार आहेत.

प्युअर खाद्यतेल मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. कोणत्याही सुप्रसिद्ध कंपनीचे रिफाईंड ओईल हे पाम तेल मिश्रित केलेले असते. कोणत्याही कंपनीने कितीही शुद्धतेचा दावा करोत, त्यामध्ये सरकारी निर्देशानुसार आणि नियम व अटी पाळून पाम तेल वापरलेच जाते. हा, हे काही १०० टक्के नाही. काही कंपन्या अजूनही घाण्याचे तेल किंवा प्युअर तेल म्हणून सूर्यफूल, करडई, शेंगदाणे आदि ही खाद्यतेले विकतात म्हणा. मात्र, त्यांचा भाव सामान्य ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. म्हणजेच मोठे मार्केट अजूनही रिफाईंड ओईलने व्यापलेले आहे. भविष्यातही त्यात काही बदल होतील अशी चिन्हे नाहीत. कारण, खाणारी तोंडे वाढलेली आहेत. अशावेळी मग आहे तेच उत्तम मानून रिफाईंड ओईल हाच पर्याय ग्राहकांना खुला आहे. त्याच रिफाईंड ओईलचे भाव सणासुदीच्या काळात कमी होण्याची शक्यता आहे.

  पाम तेलाचे सर्वात मोठे निर्यातदार असलेल्या इंडोनेशिया आणि मलेशिया यांच्याकडे या तेलाचा मोठा साठ आहे. जास्त दिवस हा साठा ठेवणे म्हणजे खराब करून घेणे आहे. त्यामुळेच हा साठा कमी करून नफा मिळवण्यासाठी आणि बाजारात लावलेले पैसे मोकळे करून घेण्यासाठी त्या देशातील व्यापारी व निर्यातदार हा साठा कमी किमतीला विक्रीला काढतील. अशावेळी मग भारत या तेलाच्या प्रमुख आयातदार देशातील ग्राहकांना याचा फायदा होईल. मात्र, सध्या जितके आयात शुल्क भारत सरकार घेत आहे. त्यात त्यांनी वाढ केली तर मग ग्राहकांना याचा कितपत लाभ मिळेल याची काहीही खात्री नाही. पेट्रोल आणि डीझेल यांचे भाव २० टक्क्यावर येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याचा लाभ ग्राहकांना मिळून दिला नव्हता. तसाच प्रकार जर खाद्यतेलाच्या बाबतीत घडला तर मग ग्राहकांना याचा लाभ मिळणे शक्य नाही.

  रुची सोया कंपनीचे सीइओ संजीव अस्थाना यांनी म्हटले की, दिवाळीच्या आसपास तेलाचे भाव कमी होण्याचे अंदाज दिसतात. प्रमुख उत्पादक देशांमध्ये उपलब्ध तेलाचा साठा आणि भारतात सोयाबीन, शेंगदाणा आणि कपाशी (सरकी) याच्या तेलबिया बाजारात येतील. अशावेळी मग तेलाचे भाव कमी होतील. याबाबत इकॉनॉमिक टाईम्स या अर्थपत्राला दिलेल्या माहितीमध्ये सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन ऑफ इंडिया याचे कार्यकारी निदेशक बी.वी. मेहता यांनी म्हटले आहे की, यंदा एकूण पेरणीचा विचार करता तेलबियांच्या लागवडीत सुमारे २० टक्के वाढ झालेली आहे. अशावेळी मग देशांतर्गत बाजारातही तेलाचे उत्पादन वाढून भाव कमी होतील.

  भारत प्रतिवर्षी किमान १.५ कोटी टन इतक्या खाद्यतेलाची आयात करतो. त्यामधील पाम तेलाचा वाटा किमान ६० टक्के आहे. ऑयल कंसल्टेंसी फर्म सनविन ग्रुप यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बाजोरिया यांनी याबाबत म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात पाम तेलाचे भाव १५ टक्के, तर सोयाबीनचे भाव १२ टक्के जास्त आहेत. सध्या बाजारात पाम तेलाचे भाव त्यामुळेच वाढलेले आहेत. भारतीय वनस्पति तेल उत्पादक संघ यांचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनीही याबाबत म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात तेलाचे भाव वाढले. सध्या ते स्थिर आहेत. मात्र, भविष्यात याचे भाव नक्कीच कमी होतील असे वाटते. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ७ लाख टन, तर त्याच्या पुढील दोन महिन्यात आणखी किमान ६ लाख टन तेलाची आयात भारतात होईल. त्याचे परिणाम बाजारावर दिसतील.

  लेखक : सचिन पाटील

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here