म्हणून सोयाबीन उत्पादकांना १२ % फटका; वाचा शेतकऱ्यांसाठीची महत्वाची बातमी

शेती हा आतबट्ट्याचा आणि प्रसंगी डोकेदुखीचाही व्यवसाय आहे. वर्षानुवर्षे अशीच नकारात्मक परिस्थिती असूनही शेतकरी त्यातून मार्ग काढून यश मिळवतात. यंदाही खरीपात शेतकऱ्यांना जास्त पावसाने असाच फटका बसला आहे. जास्तीच्या पावसासह बियाण्यातील दोष आणि वेळेवर खत न मिळण्याच्या समस्येपुढे महाराष्ट्रातील शेतकरी हतबल आहेत. तर, मध्यप्रदेश या सोयाबीन उत्पादकांच्या प्रमुख पट्ट्यात पाउस आणि कीटकांच्या हल्ल्यामुळे अपेक्षेपेक्षा यंदा किमान १२ टक्के सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) यांचे कार्यकारी निदेशक डीएन पाठक यांनी इकॉनॉमिक टाईम्स या अर्थापत्राला दिलेल्या माहितीमध्ये अशी शक्यता व्यक्त केली आहे. एकूणच देशभरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्यांच्या या संघटनेने यंदा या पिकाची काय हाल-हवा असेल ते सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंतच्या परिस्थितीवर संघटनेने असा अंदाज बांधला आहे. मात्र, जर पाउस नी हवामान असेच खराब राहिले तर यामध्ये आणखी घट होईल. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. विषाणूजन्य रोग, पिवळा मोझक आणि उतार काही रोगांमुळे यंदा मध्यप्रदेश भागातील पिकाला जास्त फटका बसला आहे. तुलनेने महाराष्ट्र नी राजस्थान या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना मात्र याचा कमी फटका सहन करावा लागणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

  सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या भागातील एक प्रमुख नगदी पिक आहे. याच्या तेलाचा आणि इतर प्रक्रियायुक्त उत्पादनांचा वापर नियमितपणे आहारात होतो. त्यामुळे या पिकाच्या प्रक्रियादार मंडळीनी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SOPA) ही संस्था स्थापन केली आहे. हे सगळेजण अशा पद्धतीने एकत्र येऊन बाजारपेठ आणि एकमेकांना तांत्रिक सहकार्य करतात. याच प्रमुख संघटनेने असे म्हटलेले असल्याने कदाचित हवामानाची परिस्थिती आणखी बिघडली तर फ़क़्त मध्यप्रदेश नाही, तर महाराष्ट्र नी राजस्थानच्या शेतकऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागेल.

  तिन्ही राज्यात यंदा मॉन्सूनपूर्व पाउस आणि नंतर मॉन्सूनचाही पाउस वेळेवर आला. त्यामुळे सोयाबीनचा पेराही वाढला. मात्र, बियाण्यातील निकृष्ठ दर्जा आणि नंतर आलेल्या अडचणीतून मग शेतकऱ्यांना मार्ग काढावा लागला आहे. महाबीज आणि अनेक खासगी कंपन्यांचे बियाणे न रुजल्याच्या हजारो तक्रारी महाराष्ट्रात दाखल झालेल्या आहेत. मात्र, त्यांची कोणतीही दखल घेण्याची कार्यवाही राज्य सरकारच्या कृषी विभागाने घेतलेली नाही. त्यातच नंतर आलेल्या सलगच्या पावसाने अनेक भागातील पिके पाण्यात सडायला सुरुवात झालेली आहे. अशावेळी सरकारी मदत काही मिळालेली नाही.

  यंदा केंद्र सरकारने मुग पिकाला ७००० रुपये प्रतिक्विंटल यापेक्षाही जास्त हमीभाव दिला आहे. मात्र, वास्तवात महाराष्ट्रात सध्या मुगाला ३००० ते ५५०० रुपये इतकाच भाव मिळत आहे. हे राजरोस चालू असतानाही सरकारी यंत्रणा ढिम्म आहेत. अशावेळी सोयाबीन पिकाची काय परिस्थिती राहणार याची काळजी उत्पादक शेतकऱ्यांना वाटत आहे. केंद्र सरकार हमीभाव जाहीर करून मोकळे होते. मात्र, त्याला अनेक फाटे फोडून असे पिक खाण्यास अयोग्य असल्याचे म्हणून व्यापारी पळवाटा काढतात. अशावेळी बाजार समित्या शेतकऱ्यांची बाजू न घेता आडते व व्यापारी यांना धार्जिणे असे धोरण ठेऊन कारभार हाकतात. परिणामी शेतकऱ्यांवरील अन्यान कमी होण्याऐवजी वाढत आहे. तर, शेतकरीही आपल्या न्याय हक्कासाठी लढायला तयार नसल्याने मग व्यापारी व बाजार समितीच्या यंत्रणांचे फावले आहे.

  संपदान व लेखन : माधुरी सचिन चोभे

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here