म्हणून कांद्याचे भाव झाले दुप्पट पण..; पहा काय आहे मार्केटची परिस्थिती

कांदा म्हणजे राजकीयदृष्ट्या सर्वाधिक सेन्सेटिव्ह क्रॉप. याच पिकाचे भाव मागील आठ महिन्यांपासून रसातळाला गेले होते. त्यातच करोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये बाजारपेठ बंद असल्याने उत्पादकांची परिस्थिती आणखीन बिकट झाली होती. अशावेळी जुना उन्हाळी कांदा वखारीत सडत असल्याचे पाहण्याचे ‘भाग्य’ कांदा उत्पादकांना मिळाले होते. मात्र, कर्नाटक राज्यासह काही भागात जास्त पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांदा बाजारात पुन्हा तेजी आलेली आहे. मात्र, एक-दोन दिवसाच्या तेजीनंतर त्यात पुन्हा काहीअंशी मंदी दिसत आहे. मात्र, आता कांद्याचे भाव किमान १३-१८ रुपये किलो राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

एकाला हसवणारे तर, दुसऱ्यांना रडवणारे पिक म्हणून कांद्याची ओळख आहे. आताही ज्या शेतकऱ्यांचा कांदा खराब होत आहे त्यांना रडण्याची वेळ कांद्याने आणली आहे. तर, ज्यांच्याकडे चांगला विक्रीयोग्य माल आहे अशा शेतकऱ्यांना मात्र अच्छे दिन आल्याचाच फील येण्यास सुरुवात झालेली आहे. मागील काही दिवस सरासरी ८ रुपये किलो या भावाच्या आकड्यात अडकलेला कांदा आता जोमाने वाढत आहे असे वाटत असतानाच दोन दिवसात पुन्हा एकदा कांद्याचे भाव काहीसे कमी झालेले आहे. मागील दोन दिवस काही बाजार समितीत कांद्याने प्रतिकिलो २२ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. परिणामी बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. मात्र, तरीही भाव त्याच पद्धतीने कायम आहेत.

  कांद्याचा बाजार म्हणजे एकदम खाली-वर होणारा बाजार. शेअर बाजारात जसे भाव बदलतात त्याच पद्धतीने कांद्याच्या मागणी-पुरवठ्याच्या गणितानुसार कांद्याचे भाव बदलतात. कर्नाटक राज्यातील खराब मालासह देशांतर्गत मार्केटमध्ये आता कुठे वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाल्याने कांद्याची मागणी वाढली आहे. त्यातच जास्त पावसामुळे महाराष्ट्राच्या बहुसंख्य कांदा उत्पादक पट्ट्यात खरीपाचा लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्यानेही वाखरीतून बाहेर येणाऱ्या उन्हाळी कांद्याला भाव मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पुढील काळात चढउतार होतानाच सरासरी १५ रुपये किलोवर हे भाव थांबण्याची शक्यता आहे. मात्र, जर जास्त प्रमाणात कांदा खराब झाला तर भाव चांगलेच वाढूही शकतात असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

  महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजार समितीमधील सध्याचे चांगल्या कांद्याचे प्रतिक्विंटलचे सरासरी भाव असे (आकडेवारी गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२०) : औरंगाबाद १००० – १५००, मुंबई १६०० – १८००, सातारा ११५० – १६००, मंगळवेढा १००० – १२००, कराड १५०० – १७००, सोलापूर ७५० – १९००, धुळे ११०० – १३५०, पंढरपूर १००० – १६००, नागपूर १४५० – १६००, सांगली ११०० – १७००, पुणे १२०० – १७००, शेवगाव १६०० – १८५०, कर्जत १००० – १२००, येवला १४०० – १८००, नाशिक १३०० – १६००, लासलगाव १६०० – १८००, निफाड १४०० – १६००, मालेगाव १२०० – १६००, वांबोरी (राहुरी) १३०० – १८००, कळवण १४०० – १८००, चांदवड १५०० – १७००, कोपरगाव १६०० – १८००, पिंपळगाव बसवंत १६०० – १९००, वैजापूर १५०० – १९५०, देवळा १६०० – १८००, राहता १६०० – १९५०, उमराणे १४०० – १८००, नामपूर १४०० – १६०० आदि.

  गुरुवारी महाराष्ट्रातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव अशा पद्धतीने आहेत. याच भावात अशीच थोडी तेजी अपेक्षित आहे. मात्र, उत्पादक शेतकऱ्यांनी जर योग्य पद्धतीने नियोजन करून कांद्याची विक्री केली नाही तर मात्र व्यापारी त्याचा फायदा घेण्यासाठी भाव काहीअंशी पाडू शकतात. त्यामुळे जास्त गर्दी न करता शेतकऱ्यांनी यंदाही कांद्याची टप्प्याने विक्री करण्याची गरज आहे.

  लेखक : सचिन पाटील

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here