होय बाबांनो, कुत्र्याचाही काढता येतो विमा; आपल्या ‘डॉगी’ला असे करा सुरक्षित, वाचा इन्श्युरन्सची माहिती

डॉगी असो की कोणताही पाळीव प्राणी असोत, त्याची देखभाल करणे आणि त्याची काळजी घेणे हे अनेकांना खूप महत्वाचे काम वाटते. काहीजण तर अशा पाळीव प्राण्यांना आपल्याच कुटुंबातील एक महत्वाचा घटक समजतात. अशाच पद्धतीच्या पेट लव्हर्ससाठी आता बजाज अलियान्स इन्शुरन्स कंपनीने नवीन विमा कवच आणले आहे. होय, वाचक मित्र-मैत्रिणींनो, हे पेट लव्हर्ससाठी म्हणजे प्राण्यांच्या मालकांसाठी नाही, तर थेट त्यांच्या डॉगीसाठी आहे..!

बरोबर वाचलेय तुम्ही. तुम्ही तुमच्या डॉगीला याद्वारे विमाकवच देऊ शकता. तेही अगदीच मस्तपैकी आणि माफक किमतीत. तर, आता पाल्हाळ खूप झाले मूळ स्कीमची माहिती पाहूयात. Bajaj Allianz General Insurance या कंपनीने हा विमा आणला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉगीला आरोग्य विमा कवच देऊ शकता. सध्या शहरात अनेकजण व्हेटर्नरी डॉक्टरांच्या सल्ल्याने तंत्रशुद्ध पद्धतीने कुत्र्यांचे पालन-पोषण करत असतात. मात्र, त्याचा हा किंवा ही डॉगी जर आजारी पडली तर मग मात्र भलतेच काहीतरी होऊन जाते. अशावेळी ही पॉलिसी कुत्र्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी तुम्हाला खूप मदत करू शकते.

बजाज कंपनीने ‘पेट डॉग इन्शुरन्स पॉलिसी’ नावाने हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. आतापर्यंत भारतात अशी ‘विशेष’ विमा पॉलिसी कोणत्याही दुसऱ्या कंपनीने आणलेली नाही. एकूणच यानिमित्ताने भारतात प्रथमच एखाद्या कंपनीने घरातील एखाद्या पाळीव प्राण्याला विमा देऊ केला आहे. यापूर्वी गोठ्यात आणि शेतात आपण व्यावसायिकदृष्ट्या पालन-पोषण करीत असलेल्या गायी, म्हशी, बैल, शेळ्या यांचा विमा आपण सगळे उतरवू शकत आहोत. मात्र, घरात ठेऊ शकणाऱ्या आणि हौसेसाठी पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांसाठी अशा पद्धतीची ही पहिलीच विमा पॉलिसी आहे.

हौसेला मॉल नसते म्हणतात. हे अगदीच खरे. पेट फुडसाठी दर्जा आणि क्वालिटी यांच्यासाठी चार अलिशान दुकाने किंवा मेडिकल शॉप फिरणारे आपण सगळे अजूनही रस्त्यावरील भाजीपाला खरेदी करतो. कपडे आणि चप्पल क्लीन असलेल्या एसी दुकानातून घेतो. आणि त्याचवेळी खाण्यासाठी लागणाऱ्या भाजीपाला, फळे यांच्या रस्त्यांवर खरेदी करतो. किराणा मालामध्येही रेट कमी असल्याचे पाहून घेताना दर्जाशी तडजोड करतो. असा वर्गही हौसेसाठी काहीही करायला तयार असतोच की. त्याच वर्गाला आनंदाने आणि सुखाने आपल्या डॉगीला जगवण्यासाठीची संधी विमा कंपनीने दिली आहे.

या पॉलिसीमध्ये किमान ३१५ रुपयांपासून प्रीमिअम सुरू होतो. सरकारी कराची रक्कम यापेक्षाही वेगळी आहे. तर, मित्र-मैत्रिणींनो, हा विमा घेऊन तुम्ही तुमच्या डॉगीला आरोग्य विमा कवच देऊ शकता. भारतीय जाती, पेडिग्री, नॉन-पेडिग्री, क्रॉस ब्रीड आणि एक्जोटीक ब्रीड अशा सर्वांसाठी आणि ३ माईने ते १० वर्षे वयाच्या कुत्र्यांसाठी आपण ही पॉलिसी घेऊ शकता. त्यासाठी लागणारा प्रीमिअम मात्र त्यानुसार बदलणार आहे. यातही RFID असे टॅगिंग असल्यास ५ टक्के सूट मिळणार आहे. अशा पद्धतीने कुत्र्यांचे लिंग, वजन, आकार आणि तब्बेत लक्षात घेऊन विमाचा प्रीमिअम ठरणार आहे.

यामध्येही कंपनीने सात वेगवेगळे प्लॅन दिलेले आहेत. ज्यानुसार आपण आपल्या कुत्र्यांना कव्हर करू शकतो. पहिला बेसिक प्लॅन आहे. ज्यामध्ये कुत्र्याला दवाखान्यातील सर्जरी (ऑपरेशन) करताना झालेल्या खर्चाचा परतावा मिळणार आहे. तर, यामध्ये आपल्याला वेगवेगळे आणखी काही कव्हर घेता येतील. त्यासाठी वाढीव प्रीमिअम द्यावा लागेल हे मात्र नक्कीच. तर, असे आहे वाचकांनो, मोर्टेलिटी बेनिफिट कव्हर, टरमिनल डिसीज कव्हर, लॉंग टर्म केअर कव्हर, ओपीडी कव्हर, चोरी / भटकणे / गायब होण्याचा थर्ड पार्टी लायबेलिटी कव्हर आदि पर्याय आहेत. एकूणच कंपनीने सर्व बाबी लक्षात घेऊन पेट लव्हर्ससाठी अशी खास स्कीम आणली आहे. आता हीच कंपनी आपल्या लाडक्या मनीमाऊ, गिनीपिग, लव्ह बर्डस आणि इतर पाळीव प्राण्यांना विमा कवच कधी आणणार याचीही आपल्याला उत्सुकता असेलच की..!

लेखक : माधुरी सचिन चोभे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here