भारतात ‘ही’ गोष्ट मिळते सर्वाधिक स्वस्त पण..; तर, काही देशांमध्ये मोजावे लागतात ५०० पट अधिक पैसे

भारत हा तरुणांचा देश आहे. असे म्हणतात. ते कागदोपत्री १००% खरे आहे. कारण,सध्या जगभरातील एकूण देशांची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येतील युवकांचा वाटा लक्षात भारत अग्रस्थानी नक्कीच आहे. मात्र, हाच देश कार्यक्षम तरुणांचा आहे किंवा नाही यावर अनेकांचे दुमत असेल. कोणाचे काहीही दुमत असो. पण एका गोष्टीवर मात्र सर्वांचे एकमत असेल ते म्हणजे टेक्नोसॅव्ही नसली तरी भारतातील युवापिढी मोबाईलसॅव्ही नक्कीच आहे. होय, कारण त्याला दुसरेही एक कारण आहे. ते म्हणजे आपल्याकडे मिळणारा स्वस्तातला मोबाईल डाटा..!

मोबाईल डाटा म्हणजे माहिती नाही हा.. हा डाटा म्हणजे इंटरनेट वापरण्यासाठी लागणारी सोय. होय, ब्रिटनच्या एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही महत्वाची गोष्ट अधोरेखित झाली आहे. मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या आणि स्वस्तात डाटा विकणाऱ्या याच कंपन्यांमुळे भारताला जगात पहिले स्थान मिळाले आहे. याचे श्रेय अर्थातच जाते ते सरकारला. कारण, मंत्री रविशंकर प्रसाद यांनी वर्षभरापूर्वीच सांगितले होते की, २०१४ मध्ये २६९ रुपयांना मिळणारा एक जीबी मोबाईल डाटा भारतात १२ रुपयांना मिळत आहे. आता तर त्यामध्ये आणखी बदल झालेला आहे. भारतात सर्व कंपन्यांचे प्लॅन आणि किंमत लक्षात घेता फ़क़्त ६.७ रुपये इतक्या नगण्य किमतीत १ जीबी डाटा मिळत आहे. होय, सध्याबाजारात चहाची किंमत सरासरी १० रुपये आहे. तोही टपरी किंवा छोट्या हॉटेलातला चहा. पण हाच चहा जर आपण अमृततुल्य नावाने रंगवलेल्या टपरीत घेतला तर किमान १० रुपयांना पडतो. आणि मोठ्या हॉटेलात २० ते १५० रुपये..!

  म्हणजे भारतात तरुणाईला मनोरंजनासाठी आणि व्हाटस्अॅप नावाच्या विद्यापीठात पदव्या घेण्यासाठी खूप कमी किमतीत हा डाटा मिळत आहे. त्याचवेळी इतर काही देशांमध्ये हाच डाटा ग्राहकांना ५८३ पटीने महाग घ्यावा लागत असेल. हे म्हणजे महिन्याचा किराणा आणायला लागणाऱ्या पैशांसारखे आहे. होय, जगभरची तुलना करता सर्वाधिक महाग डाटा हेलेना नावाच्या बेटावर भेटतो. तिथेच इतक्या पटीने हा महागडा मोबाइल डाटा कंपन्या सर्व्ह करतात. तिथे ५२.५ डॉलर प्रति जीबी इतका महाग हा डाटा विकतात. तर, जगभरात सगळीकडे गुणोत्तर लक्षात घेतल्यास १ जीबी डाटासाठी किमान ५ डॉलर मोजावे लागतात. अमेरिकेत त्यासाठी ८ डॉलर, तर ब्रिटनच्या भूमीवर १.४ डॉलर. भारतात २०१८ नंतर भारतात इंटरनेट डाटा किमान 65 टक्के इतका स्वस्त झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोबाईलचे महत्व वाढले आहे. मात्र, मोबाइलवर कार्यक्षम व कर्तव्यदक्ष असलेली ही तरुणाई प्रोडक्टिव कामात मागे पडत असल्याची ‘बोगस’ ओरड काही ‘तथाकथित’ अभ्यासक, उद्योजक आणि संशोधक करीत आहेत.

  एकूणच आपल्याकडे मोबाइल डाटा खूप स्वस्त मिळतो हे मान्य. मात्र, रेंज नसणे, कॉल ड्रोप होणे, त्याने डोकेदुखी होणे, चार-चार दिवस एखादा मोबाइल मनोरा बंद राहणे, त्याने काम ठप्प होणे अशा बहुसंख्य समस्या आहेत. त्यामुळेच कमी किमतीत मोबाईल डाटा मिळूनही ज्यांना अशा मोबाईल डाटाद्वारे काहीतरी काम करण्याची इच्छा आहे अशा सर्वांना यामुळे मोठा मानसिक फटका सहन करावा लागत आहे. कमी भावात खरेदी केलेल्या या डाटामुळे अनेकदा विकतचा मनस्ताप घेतल्याचा फील आपण सर्वांनी घेतलेला असेल. बरे, याबाबत तक्रार करण्यासाठीची सोयही सरकारने बंद करून टाकली आहे. कारण, एक-दोघांची तक्रार यापूर्वी ट्रायकडे केली ही काहीतरी कारवाई होण्याची शक्यता होती. २०१८ नंतर ट्राय नावाच्या या संस्थेने तक्रार करण्याचा ट्राय करू न देण्याची शपथ घेत वैयक्तिक तक्रारी बंद करून टाकलेल्या आहेत. एकूणच यानिमित्ताने कमी किमतीच्या डाटाद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्याचीही संधी मोबाइल कंपन्या भारतात साधत आहेतच की..!

  लेखक : सचिन मोहन चोभे

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here