धक्कादायक : आणखी एका विरोधी नेत्याला विषबाधा; रशियात खळबळ, जर्मनीत उपचार सुरू

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या राज्यात सुरू असलेल्या सर्वच घडामोडीबाबत जगभरात संशय व्यक्त केला जातो. मुळात संशय व्यक्त करण्याजोग्या परिस्थिती त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत.  अशातच आता तेथील एका विरोधी पक्षातील नेता संशयास्पद पद्धतीने आजारी पडला आहे. त्या नेत्यावर जर्मनीत उपचार सुरू आहेत. मात्र, अशावेळी या नेत्याला काहीतरी वेगळीच विषबाधा झाल्याची बातमी आलेली आहे. एकूणच आतापर्यंत रशियामध्ये झालेल्या राजकीय हत्यांही यामुळे चर्चेत आलेल्या आहेत.

पोलीनिअम नावाचे किरणोत्सर्ग करणारे विष देऊन रशियन पत्रकार व विरोधकांची हत्या झाल्याचे यापूर्वीच उघडकीस आलेले आहे. त्याबाबतीत पुतीन यांचा रशिया आणि क्रेमलीन जगभरात चर्चेत असतात. त्याच पुतीन यांच्या रशियामध्ये आता आणखी एका विरोधी नेत्याच्या आजारपणाने खळबळ उडाली आहे. अलेक्सेई नवलनी असे या नेत्याचे नाव आहे. पुतीन यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक धोरणामुळे रशियाची कशी वाट लागली आहे. तसेच या हुकुमशाही नेत्यामुळे देश कसा संकटात येऊ शकतो याबाबतची मांडणी अलेक्सेई करीत असतात.

  आतापर्यंत पुतीन यांच्या कार्यकाळात सरकारी यंत्रणांनी घटलेला उच्छाद आणि त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागलेला असल्याकडे अलेक्सेई यांनी वेळोवेळी लक्ष वेधलेले आहे. मात्र, राष्ट्रवादी विचारांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अलेक्सेई यांची ही विधाने देशविरोधी वाटतात. त्यांनाच आता आजारी पडल्यावर तिथे योग्य उपचार मिळण्यात अडचणी आणण्यात आल्याचा आरोप अलेक्सेई समर्थकांनी केला आहे. तर, जर्मनीच्या चान्सलर अन्जेला मर्केल यांचे प्रवक्ते स्टेफन सीबर्त यांनी अलेक्सेई यांना कोणतीतरी विषबाधा झाल्याचे म्हटले आहे.

  एकूणच यानिमित्ताने रशियासह जगभरात पुतीन यांच्या पातळयंत्री हुकुमशाहीचा अलेक्सेई हे आणखी एक बळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशाच्या विरोधातील ठरवून रशियात वागणूक दिली जाते. रशियाची आर्थिकदृष्ट्या वाट लागलेली असतानाही तेथील राष्ट्रवादी कार्यकर्ते पुतीन यांनाच मसीहा व देशाचा पिता समजत आहेत. त्यातूनच पुतीन हे आता रशियापेक्षा महान वाटायला अनेकांना सुरुवात झालेली आहे. पुतीन यांनीही २०३४ पर्यंत सत्ता कब्जात ठेवणाऱ्या संविधानिक सुधारणा पूर्ण करून घेतल्या आहेत. अशावेळी कोणीही त्यांना विरोध करायला धजावत नाही. काहीजण पुढे येतात. तर, त्यांचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू होतो.

  अशीच भयानक परिस्थिती आहे रशिया देशात. आताही विषबाधा झाल्यावर अगदी कोमात जाईपर्यंत अलेक्सेई यांना योग्य उपचार मिळण्याची सोय झालेली नाही. उलट त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगून सरकारी यंत्रणा व डॉक्टर वेळकाढूपणा करीत होते. अशावेळी जर्मनीत अलेक्सेई यांना हलवण्यात आल्यावर खऱ्या अर्थाने त्यांची प्रकृती सुधारली आहे. मेटाबोलिक डीसऑर्डरमुळे ते सध्या कोमात आहेत. मात्र, त्यांची बरी होण्याची चिन्हे आहेत. परंतु, जरी ते बरे झाले तरी कितपत बरे होतील आणि केंव्हा पूर्ण क्षमतेने काम करू शकतील याबाबत संशांकता व्यक्त होत आहेत. एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा पुतीन यांचा रशिया, तेथील त्यांची पातळयंत्री हुकुमशाही आणि अनागोंदी कारभार यानिमित्ताने चर्चेत आलेला आहे.

  विरोधी गटातील कार्यकर्ते व नेते अलेक्सेई यांना लवकर बरे होण्यासाठीची वाट पाहून आहेत. रशियाला सध्या विरोधी आवाजाची गरज आहे. अशावेळी जर असे महत्वाचे मोहरे हा देश गमावून बसला तर भविष्यात येथील हुकुमशाही आणखी दृढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

  लेखक : सचिन पाटील

   LEAVE A REPLY

   Please enter your comment!
   Please enter your name here