चला, घरीच ट्राय करा भेंडीची ‘ही’ रेसिपी आणि हॉटेलात खाल्ल्याचा फील मिळवा

सध्या करोना विषाणूने अवघे जग लॉकडाऊन करून टाकले आहे. अशावेळी हॉटेलिंग करणाऱ्यांना घरीच राहून खावे लागत आहे. नाही म्हणायला काही ठिकाणी हॉटेल डिलिव्हरी देत आहेत. मात्र, एकूणच रोडावलेली ग्राहकांची संख्या, शेफ मंडळींची वणवा आणि इतर कारणाने म्हणावे असे अजूनही काही बहुसंख्य हॉटेलात चटपटीत खायला मिळत नाही अशावेळी आज आपण पाहणार आहोत खास रेसिपी. ज्याद्वारे तुम्ही कुटुंबियांना तोंडाला पाणी सुटणाऱ्या चवीचा अनुभव देऊ शकणार आहात.

पहिली रेसिपी आहे बुद्धीवर्धक अशा भेंडीची. होय, आम्ही तुम्हाला चटपटीत भेंडी मसाला बनवायला शिकवणारी रेसिपी येथे देत आहोत. ही घरीच ट्राय करा. अनेक लोकांना भेंडी आवडत नाही. होय, कारण हिच्यात कितीही चांगले गुणधर्म असले तरीही तिला खाण्याची इच्छाच होत नाही. मात्र, जर चटपटीतपणे ही बनवली आणि सर्व्ह केली तर? मग नक्कीच खायला आवडेल की तुम्हाला? आम्ही खात्री देतो की, खाली दिलेल्या पद्धतीने मसाला भेंडी बनवली तर आपणही ही नाआवडती भाजी नक्कीच १००% खाल. ही खूप सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. चविष्ट भेंडी मसाला बनवायचा असेल तर खालीलप्रमाणे साहित्य घ्या.

यासाठी लागणारे साहित्य असे : दोन कांदे, एक टोमॅटो, लाल तिखट, हळद, जिरे व गरम मसाला, थोडेसे फ्रेश क्रीम, तेल किंवा गावरान तूप, अर्धा किलो भेंडी, मीठ आदि.

आता हे साहित्य घेतले असेल तर बनवायलाही घ्या की. कारण, साहित्य नाही खाता येत. तर किचनमध्ये बनवलेला भेंडी मसाला हा पदार्थच खावा लागतो. पहिले भेंडी उभी चिरावी. (भेंडीचा आकार कमी असेल तर तशीच ठेवायला हरकत नाही) त्यानंतर चिरलेली भेंडी कढईमध्ये तेल तापवून त्यात तळून घ्यावी. भेंडी तळून घेऊन बाजूला काढल्यावर त्याच तेलात जिरे, हळद व तिखट मिरची, कांदे, टोमॅटो (उभे चिरून) एकजीव होईपर्यंत परतून घ्या. त्याला पुन्हा थोडे तेल सुटत आले की, भेंडी आणि गरम मसाला यासह गरजेनुसार मीठ घालून मस्तपैकी परतून घ्या. अशा पद्धतीने परतलेली भेंडी शिजली की मग त्यावरून थोडे फ्रेश क्रीम घालायचे.

अशा पद्धतीने आपली भन्नाट भेंडी मसाला डिश तयार होते. हिलाच गरमागरम पद्धतीने सर्व्ह करून घ्यावे. भाकरी, चपाती, रोटी यासह जोडीला कांदा, काकडी, लोणचे आणि पापड देऊन आपण हे मिटक्या मारीत खाऊ शकता की..!

मुळात अनेकांना भेंडी घरी केली की आवडत नाही. मात्र, तिच भेंडीची भाजी ही मंडळी हॉटेलात आवडीने खातात. हॉटेलात काही भेंडीची चव बदलत नाही. मात्र, तिथे बनवण्याची आणि सर्व्ह करण्याची एक खास पद्धत असते. त्यामुळे त्या ठिकाणी तेलाने पचपचीत असूनही अनेकांना खायला आवडते. मात्र, भेंडी हा नियमितपणे खाण्याजोगा असा भन्नाट पदार्थ आहे. फ़क़्त घरी एकाच पद्धतिए न बनवता भेंडीच्या वेगवेगळ्या डिश बनवून उत्तम पद्धतीने सर्व्ह करावे लागेल. मुलांनाही मग अशी जीवनसत्वयुक्त भाजी खायला आवडेल की मग..!

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here