ये दिल मांगे ‘मोर’; ‘ते’ विषय नाही पण मोदींमुळे राष्ट्रीय पक्षी आला ट्रेंडमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक वेगळे नेते आहेत. लोकांची नस ओळखलेले आणि लोकांच्या प्राथमिक समस्यांकडील लक्ष दुसरीकडे वेधणारे नेते म्हणून आता ते सर्वमान्य झालेले आहेत. सध्या देशात करोना विषाणूने कहर केला आहे. कोविड १९ चे रुग्ण कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्याचवेळी इतरासही सामाजिक, आर्थिक आणि परराष्ट्र संबंधाचे प्रश्न कायम आहेत. त्यावर ना मन की बात, ना जन की बात करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहतात. आजही त्यांचा हाच फंडा कमी आलेला आहे.

देशातील संघटीत क्षेत्रातील किमान २ कोटी आणि असंघटीत क्षेत्रातील किमान १० कोटी रोजगार गेलेले आहेत. शेती क्षेत्राचे पुरते वाटोळे होत आलेले आहे. अशावेळी वृत्तवाहिनीच्या पडद्यावर आपल्याला फ़क़्त सुशांत सिंग याच्या आत्महत्येचे प्रकरण दिसत आहे. तसेच मोदी सरकारच्या काही घोषणा आणि इतर जीवनावश्यक नसलेल्या मुद्यांवर माध्यमांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. आजही तसाच प्रकार मोर नावाच्या पक्ष्याबाबत घडला. मोदींच्या जवळचा मोर कसा त्यांचा मित्र आहे हे दाखविणारा हा व्हिडिओ आल्यावर भाजप समर्थकांना त्यातले मोदी कसे साधू व संत आहेत असेच वाटले. त्यांनी ती भावना शेअर केले. मग, भाजपचे समर्थक नसलेल्यांनी ते साधू किंवा संत नाही, तर संधिसाधू असल्याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला.

हे काही पहिले प्रकरण नाही. मोदी आणि त्यांचे असे कारनामे सतत चर्चेत असतात. त्यांचे मै देश नाही बीकने दुंगा हे व्हिडिओ किंवा १५ लाख खात्यावर जमा करण्याचा मुद्दा तर रोजच्यारोज फेसबुक आणि इतर सोशल मिडीयामध्ये झळकत असतो. अशा पद्धतीने सुरू असलेले हे ट्रेंडिंग- ट्रेंडिंग खेळण्याचे राजकारण देशाला कुठे नेणार हेच समजेनासे झालेले आहे. भाजपच्या धोरणांमध्ये गफलत आहे. मात्र, ती ठोसपणे अधोरेखित करण्याची पात्रता अजूनही कॉंग्रेस पक्षात आलेली नाही. देशातील महत्वाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात काँग्रेस आणि एकूणच विरोधी पक्ष खूप कमी पडत आहेत. त्याचवेळी जनभावनेची नस समजलेल्या मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण राजकीय अवकाश व्यापण्याची तयारी केली आहे.

अशावेळी भाजपचे समर्थक सोशल मिडीयामध्ये अंगावर येत आहेत. तर, विरोधकांचा आवाज पूर्णपणे बसला आहे. ते मोदी व भाजपच्या नावाने आवाज दाबला जात असल्याची आवई उठवून पाहत आहेत. मात्र, वास्तवात मुक्या असलेल्या विरोधकांनी विवेकाचा आवाज बुलंद करण्याची काहीही तसदी घेतलेली नाही. त्यामुळेच मोर, थाळी वाजवणे किंवा तत्सम मुद्यांवर फ़क़्त ते टीका करीत आहेत. मोदी सरकारने देशाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक धोरणात केलेल्या बदलामुळे भविष्यात होणारे परिणाम किंवा दुष्परिणाम सांगण्याची बुद्धी विरोधी चमूने पूर्णपणे गमावली आहे.

आजही मोर दिसल्यावर मोदींच्या साधुपुरुष असण्याच्या मुद्यावरच विरोधी गटातील नेते व कार्यकर्ते बोलायला लागलेले आहेत. मोदींनी एक मुद्दा दिलाय तो इतर मुद्यांकडून इतरत्र लक्ष वेधण्यासाठी हा साधा नियम सर्व विरोधक सोयीस्करपणे विसरले आहेत. काँग्रेसच्या काळातही असे प्रकार करणारे काँग्रेस नेते मोदींच्या या फेऱ्यात अडकून पडत आहेत, हे विशेष आहे. मुळात मोर नाही, तर नोकऱ्या, अर्थव्यवस्था आणि देशाचा सर्वांगीण विकास यामध्ये ये दिल मांगे ‘मोअर’ म्हणण्याची आणि त्यासाठी सरकारला जाब विचारण्याची ही वेळ आहे. परंतु, सत्ताधारी जसे आहेत, तशीच जनता आणि विरोधक असलेल्या या देशात ‘मोअर’ नाही तर ‘मोर’ कोणावर हाच मुद्दा महत्वाचा बनला आहे हे दुर्दैव..!

लेखक : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here