कॅनलच्या पाणीपुरवठ्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम; तर, मायक्रो इरिगेशनचे ‘हे’ आहेत फायदे, वाचा माहिती

दिल्लीमध्ये टाईम्स माध्यम समूहातर्फे आयोजित ‘टाइम्स वॉटर समिट’मध्ये मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित दोन भागाची लेखमाला आपण ‘कृषीरंग’वर वाचत आहात. पाण्याचे महत्व आणि भविष्यातील धोरण ठरवण्यासाठी अशा प्रभावी कार्यक्रमाची देशाला गरज आहे. अभ्यासक एका ठिकाणी येऊन विचारमंथन करतात आणि यातूनच समाज, देश व समूह यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच ही परिषद दखलपात्र ठरते. यामध्ये कॅनलच्या पाणीपुरवठ्याचे दुष्परिणाम आणि मायक्रो इरिगेशनचे फायदे याचे मुद्दे मांडण्यात आले.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

सध्या बिहार राज्यातील महापूर ट्रेंडमध्ये आहे. त्या महापुराने बिहारमधील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचवेळी २०१८ हे वर्ष आठवतेय का? त्यावेळी याच महापूरग्रस्त बिहारमध्ये २८० ब्लॉकमध्ये दुष्काळ पडला होता. इतकी पाण्याची अनियमितता आहे आपल्या भारत देशात. याची आता आपल्याला वाईट अर्थाने का होईना सवय झालेली आहे. मात्र, ही सवय मोडून पाण्याच्या संधारणावर आपल्याला आता काम करावेच लागणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांचे पाणी फाउंडेशन, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे नाम फाउंडेशन, फादर बाकर यांची वॉटर संस्था यासह पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्रसिंह यांचे पाण्यावरील काम मोठे आहे. याच कामात यापुढे आपल्याला सगळ्यांना सक्रीय व्हावे लागेल.

‘टाइम्स वॉटर समिट’ यामध्ये सूक्ष्म सिंचन विषयाबद्दल मांडलेले मुद्दे असे :

  1. पाणी समस्येवर यशस्वी मात करण्यासह शेतीमध्ये बेसुमार पद्धतीने वापरल्या जात असलेल्या रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो.
  2. सध्या झाडांच्या मुळांना नाही, तर थेट जमिनीत खत दिले जाते. त्यापैकी मोठ्या प्रमाणातील खत पाण्यात विरघळून पाण्याचे प्रदूषण होते.
  3. सध्याच्या मोकाट सिंचन पद्धतीने पाणी दिल्याने पाण्याचा वापर कमी आणि बेसुमार गैरवापर जास्त होत आहे. ठिबक व तुषार सिंचनाने ही समस्या दूर होते.
  4. पाण्याचा कार्यक्षम वापर केल्याने अधिकची जमीन ओलिताखाली येऊ शकते.
  5. वापसा आल्यावरच पिकांना पाणी दिले जाते. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.

अशा पद्धतीने सूक्ष्म सिंचानावरील मुद्दे या परिषदेत मांडण्यात आले. पाणी हेच जीवन असल्याचे यामध्ये अनेकांनी आग्रहाने सांगितले. २०१९-२० च्या आर्थिक सर्वेक्षणातून अनेक मुद्दे स्पष्ट झालेले आहेत. गहू, कांदा, बटाटा व भात या पिकांना सूक्ष्म सिंचन खूप गरजेचे असल्याचे त्यातून स्पष्ट दिसले आहे. तसेच याद्वारे १० नाही तर १७ टक्के उर्जाबचत आणि ३० ऐवजी थेट ४० टक्के मनुष्यबळ (मजुरी) बचत होऊ शकते. तसेच उत्पादनात २० tw ३८ टक्के इतकी वाढ होईल असाही अंदाज अभ्यासकांचा आहे.

‘टाइम्स वॉटर समिट’ यामध्ये कॅनलच्या पाणीपुरवठ्याबाबत मांडलेले मुद्दे असे :

  1. पाटपाण्याखाली मोठ्या प्रमाणात जमीन अडकते. यामुळे सुपीक जमिनीचे क्षेत्र कमी असतानाच आणखी घटते.
  2. पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. परिणामी पाण्याचा वापर कार्यक्षम पद्धतीने शक्य होत नाही.
  3. पाणी मोकाट पद्धतीने सोडले गेल्याने कुठेही जाते आणि जिथे जायला पाहिजे तिथे अनेकदा पोहचतच नाही.
  4. या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीतच मुरते. आणि मुरलेले पाणीही तितके प्रभावी पद्धतीने वापरणे शक्य होत नाही.
  5. याद्वारे शेतकरी खूप जास्त प्रमाणात जमिनीला पाणी देतात. परिणामी यातून शेतजमिनी खारवट व क्षारयुक्त होऊन नापीक होतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात शेतजमिनी मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या आहेत. अशावेळी तेथील श्रीदत्त सहकारी कारखान्याने पुढाकार घेऊन शेतजमिनी सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रात जास्त प्रमाणात सिंचन असलेल्या भागात ही गंभीर समस्या उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी आता आपल्याला पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची गरज आहे.

(उत्तरार्ध)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here