वॉटर स्ट्रेसला पर्याय आहे फ़क़्त सूक्ष्म सिंचन; वाचा ‘टाइम्स वॉटर समिट’मधील महत्वाचे मुद्दे

पाणी हेच जीवन असे आपण म्हणतो. आपले राजकीय नेते, प्रशासकीय नेते आणि अभ्यासक चालता-फिरता याचा जयघोष करतात. मात्र, प्रत्यक्षात भारतात किंवा संपूर्ण जगभरात पाणी हा मुद्दा फ़क़्त चर्चेत आहे. पर्यावरण आणि कृषी व्यवस्थेमधील महत्वाचा घटक असलेल्या पाण्याच्या कमतरतेवर फ़क़्त बोलण्याचे दिवस संपले आहेत. आता गरज आहे खऱ्या अर्थाने ठोस कृतीची. ‘टाइम्स वॉटर समिट’मध्ये हाच मुद्दा अधोरेखित झाला. पाण्याचा किफायतशीर आणि माफक वापर करण्याची गरज सर्व अभ्यासकांनी आग्रहाने मांडली.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

दिल्लीमध्ये टाईम्स माध्यम समूहातर्फे आयोजित या महत्वाच्या कार्यक्रमात भारतातील पाण्याची परिस्थिती आणि वापर यावर मंथन करण्यात आले. त्यानुसार सरकारी अहवालातील आकडेही इथे मांडण्यात आले. त्याद्वारे असे स्पष्ट दिसते की, देशात सध्या प्रतिमाणशी १५४४ क्युबिक मीटर इतके पाणी आहे. जगातील एकूण पाण्याची प्रत्येक माणसाला असणारी गरज १७०० क्युबिक मीटर इतकी असावी असा संकेत आहे. त्याचवेळी १००० पेक्षा कमी पाणी असल्यास पाण्याचे दुर्भिक्ष अशी परिस्थिती समजली जाते. भारतात पाण्याचे दुर्भिक्ष अजिबात नाही. हा, काही भागात आहे अशी परिस्थिती. पण काही भागात अमाप पाणीही आहेच की. एकूण परिस्थिती लक्षात घेता आता देशात पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

भारतात प्रतिवर्षी सरासरी ४००० क्युबिक मीटर इतका पाऊस होतो. यातले फ़क़्त ४८ टक्के पाणी आपण वापरतो. समुद्राला पाणी जाण्यासह बाष्पीभवनाद्वारे जास्त पाणी पुन्हा निसर्गात स्वाहा होते. अशावेळी वाढती लोकसंख्या आणि शेतीला लागणाऱ्या पाण्याचा मेळ बसवून नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. त्यासाठीचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे सूक्ष्म सिंचन. होय, ठिबक आणि तुषार सिंचन यासह सबसरफेस ड्रीप आणि कमी पाण्यावर येणारी पिके ही आपल्या भारत देशाची गरज बनली आहे.

ऊस पिकासाठी लागणारे पाणी आणि त्याद्वारे मिळणारे उत्पन्न लक्षात घेता ऊस शेतीला पर्याय उभा करावा लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांना उसाची लागवड करायला सांगून भागणार नाही. उस शेतीमधून मिळणारे किमान शाश्वत उत्पन्न कोणते पिक देऊ शकेल आणि त्यासाठी किती प्रमाणात पाणी कमी लागेल याचे उत्तर तयार करावे लागेल. एकतर शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय. त्यात जर शेतकऱ्यांना पैसे मिळणारे हे करू नका आणि ते करा असे सांगितले तर ते ऐकतीलच कसे..?

देशात प्रतिवर्षी २-३ मीटरने पावसाची टक्केवारी कमी होत आहे. तर, फळबागा आणि नगदी पिकांखालील क्षेत्र व शहरी भागातील पाण्याची मागणी वाढत आहे. अशावेळी पाण्याचेही व्यवस्थापन आवश्यक आहे. नाहीतर, यावरून काय होईल ते आपण सर्वजण जाणतातच की.. त्यावरच या कार्यक्रमात सविस्तर उहापोह झाला. आपल्याकडे भारतात राजस्थान राज्यात प्रतिवर्षी वाळवंट आहेच. त्याचवेळी बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये महापूर ही समस्या बिकट आहे. आताही तिकडे महापुरात हजारो लोक विस्थापित झालेले आहेत. महाराष्ट्र राज्यातही बहुसंख्य भागात दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. अशावेळी ठोस कार्यवाही करूनच यातून मार्ग काढावा लागेल.

पाणी हेच जीवन आहे आणि तेच जीवन आनंददायी आणि समाधानकारक करण्यासाठी आपल्या सर्वांना कंबर कासावी लागणार आहे. ‘टाइम्स वॉटर समिट’मध्ये याच मुद्यावर खल झाला. देशाची भविष्यातील गरज आणि शेतकरी मित्रांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सूक्ष्म सिंचनाद्वारे शेती आपल्याला करावीच लागेल. कारण, पाण्याचा किफायतशीर वापर हीच खऱ्या अर्थाने पाणी बचत आणि पाणी निर्मितीही आहे. सध्याच्या चुकीच्या जलसिंचन व शेती पद्धतीत बदल करण्यासाठी याशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही.

शहरी भागातील पाण्याचा वाढता वापर, औद्योगिक वापरासाठी दिले जाणारे मुबलक नव्हे अतिरिक्त पाणी ही महाराष्ट्राचीही समस्या आहे. शेती आणि शेतकरी देशोधडीला लागू न देण्यासाठी आणि सर्वांना हक्काचे पोटभर जेवण मिळावे यासाठी पाण्याच्या मुद्यावर केंद्र आणि राज्य सरकारला ठोस कार्यवाही करावी लागेलच.. नाहीतर.. काय होईल ते सांगण्याची अजिबात गरज नाहीच की..!

(पूर्वार्ध)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here