म्हणून त्यांनी सुरु केलंय D2H भाजीपाला मॉडेल; वाचा शेतकरी दांपत्याची भन्नाट स्टोरी

गरज ही शोधाची जननी आहे. हे आपण पुस्तकात शिकतो. मात्र, ते काही फ़क़्त पुस्तकी वाक्य नाही. खऱ्या अर्थाने मानवाच्या एकूण प्रगतीमध्ये हीच गरज महत्वाची बनली आहे. फ़क़्त गरजेच्या वेळेला पर्यायी मार्ग शोधणारे पाहिजेत इतकेच. अशीच किमया केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील एका शेतकरी जोडप्याने अशीच डोक्यालिटी लढवून भाजीपाला विक्रीचे D2H मॉडेल उभारले आहे.

करोनाचा काळ आला आणि शेतकऱ्यांचे दिवस आणखी फिरले. घर फिरल्यावर वासे फिरल्याचा अनुभव आतापर्यंत अनेकदा शेतकऱ्यांनी सरकारच्या कृपेने घेतला आहेच. त्यात करोना नावाच्या राक्षसाने शेतीमध्ये मोठी पोकळी निर्माण केली. अशावेळी हातावर हात देऊन बसायला आणि दिवस ढकलायला शेतकरी थोडेच सरकारी नोकरदार आहेत. मग, काही शेतकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने यावर मात करण्याची तयारी सुरू केली. असाच एक अवलिया अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात सापडला आहे. लक्ष्मण साहेबराव बाबर (रा. बाबरवाडी) नावाच्या या पठ्ठ्याने करोनाच्या साथीच्या काळात बायकोच्या साथीने भाजीपाला विक्रीचे D2H मॉडेल उभारले आहे.

फेसबुकवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट मामांनी ही भन्नाट स्टोरी प्रसिद्ध करून टाकली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, परवा आम्ही अंगणात गप्पा मारत बसलो होतो. सगळेच कुटुंबीय बसलेलो असतानाच माझ्या थोरल्या बंधूंना (प्रकाश घनवट) एक फोन आला. त्यांनी संबंधीताशी फोनवर चर्चा सुरू केली होती. आम्ही ऐकत होतो. मात्र, ते काय बोलतात ते समजत नसल्याने शांत होतो. मग बोलता-बोलता त्यांनी घरात असलेल्या आमच्या वहीणींना मोठ्याने हाक मारली. त्यांनी मोठ्या आवाजात विचारले की, “ए.. काही भाजीपाला घ्यायचाय का..?” मग त्यावर आतून आवाज आला, “हो, घ्यायचाय..”

त्यांनी पुढे लिहिले आहे की, मला समजले नाही फोन वर बोलताना भाजीपाला कुठुन मध्येच आला. पण पाच-दहा मिनिटांनी एक बोलेरो जीप गाडी अंगणात येउन उभी राहिली. आमच्या गावच्याच एका वाडीतील तरुण जोडपे त्यातून खाली उतरले. मी कुतूहलाने हे सगळे पाहत होतो. “काय भाजी पाहिजे सांगा,” तो तरुण म्हणाला अन् मग बोलेरोची दारे उघडली गेली. बोलेरोचे मधले सीट काढुन जागा केली होती त्यांनी. तिथे भाज्यांनी भरलेले क्रेट ठेवलेले होते. वहिणी व बंधूंनी हव्या त्या भाज्या सांगितल्या आणि त्या तरुणाने पटापट भाज्या काढुन त्याच्या पत्नीकडे दिल्या. तिनेही मोजुन वाहिनीच्या पिशवीत त्या टाकल्या.


मला याचे फारच कौतुक वाटले. सध्या कोरोनामुळे आठवडे बाजार बंद आहेत. शेतकर्‍यांना विकता येइना व ग्राहकाला भाजी मिळेना, अशी परिस्थिती आहे. तिकडे शहरात फेरीवाले आरोळी देतात पण खेड्यात अशी व्यवस्था नसते. मग या तरुणाने डोके वापरले. बोलेरोत माल भरुन थेट वाड्या-वस्त्यांवर घरपोहोच भाजी पोहोचवण्याचे काम सुरु केले. डायरेक्ट टू होम..! वा..! किती छान..! शेतकर्‍याला ना आठवडे बाजाराची वाट पहायला नको, ना ग्राहकाला बाजारात जायचे कष्ट.. आणि जास्तीचा वेळ वाया घालवायला नको. थेट दारात भाजी हजर. तीही बेस्ट क्वालिटीची, असेही त्यामध्ये घनवट यांनी म्हटले आहे.


शेतकरी संघटनेचे नेते म्हणून त्यांनी पुढे म्हटले आहे की, हा तरुण ओळखीचाच होता. मग मीही त्याला विचारलं, “तू हे का सुरु केलं..?” तो त्यावर म्हणाला, “मामा, मग काय करणार.. बाजार बंद आहेत, मग अशावेळी माल विकायचा कुठं..? यातला बराच शेतमाल माझ्या शेतातलाच आहे. फ़क़्त बटाटे, आले वगैरे विकत घेतो. ज्या कोणत्या रुटवर जायचे तिकडच्या ग्राहकांना फोन करुन भाजी आणल्याचे सांगतो. घेतात लोकं बरोबर.. बर चाललय आमचं.. हजार एक रुपये सुटतात रोजचे. खर्च जाउन नवरा-बायकोला दिवसात इतके मिळतात की.. आणखी काय पाहिजे अशा कोरोनाच्या काळात.” आमच्या घरासमोरचे हे दृष्य पाहुन मला खरच समाधान वाटलं. बाजार स्वातंत्र्य असे अनेक मार्ग दाखवुन देईल का?

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

https://www.facebook.com/plugins/post.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fanil.ghanwat.9%2Fposts%2F3533661853351336&width=500

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here