शहीद राजगुरू जयंती | स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढणाऱ्या क्रांतिकारकांचे ‘गुरू’ म्हणजेच राजगुरू..!

शहीद असा शब्द आठवला तरी आपल्या सर्वांच्या समोर तीन चेहरे आणि नावे येतात. ती नावे आणि चेहरे असतात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे. होय, तेच क्रांतिकारक ज्यांनी देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणाची बाजी लावली. त्यापैकीच एक असलेल्या शहीद राजगुरू यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील हा लेखप्रपंच.

पोलीस उपअधीक्षक सॅन्डर्स या ब्रिटीश सत्तेच्या क्रुरकर्मा अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये राजगुरू अग्रभागी होते.   त्यांनीच पहिल्या दोन गोळ्या सॅन्डर्सवर झाडल्या होत्या. त्यांनतर किमान दोन वर्षे ते भुमीगत पद्धतीने देशभरात क्रांतिकारकांचे नेटवर्किंग करीत होते. अखेर सप्टेंबर १९२९ ला त्यांना अटक झाली आणि मग पुढे ब्रिटीशांच्या न्यायालयात खटला चालल्यावर त्यांना मार्च १९३१ ला फाशी देण्यात आली. त्यांच्यासह त्यावेळी भगतसिंग व सुखदेव यांनाही फाशी देण्यात आली. हीच तिघांची जोडी इतिहासात अजरामर आहे.

राजगुरू म्हणजे शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड गावाचा. दि. २४ ऑगस्ट १९०८ रोजी त्यांचा जन्म झाला. आता त्यांच्याच नावाने हा तालुका ओळखला जातो. राजगुरुनगर तालुका असे नामकरण नंतर करण्यात आले. सुरुवातीच्या काळात ते कॉंग्रेस पक्षाच्या सेवा दलात सक्रीय होते. शिक्षणानिमित्ताने अमरावती येथील हनुमान व्यायाम शाळेत असतानाच ते देशाच्या सेवेसाठी सक्रीय झाले. पुढे काशी येथे संस्कृतच्या अभ्यासासाठी ते गेले. त्यांनी तिथे इतर भारतीय भाषाही शिकून घेतल्या. याचा कालावधीत त्यांचा संपर्क डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांशी आला. सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद यांच्याशी त्यांचा परिचय झाल्यावर मग पुढे त्यांनी डाव्या विचारांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीमध्ये कामास सुरुवात केली. भगतसिंग, जतीनदास, सुखदेव यांच्यासमवेत त्यांनी क्रांतीच्या कार्याला वाहून घेतले.

दरम्यान, सायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ज्येष्ठ नेते लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली. पुढे लालाजींचे त्याच आजारपणात निधन झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला हा मोठा धक्का होता. त्याचाच बदला म्हणून मग क्रांतिकारकांनी सॅन्डर्सच्या हत्येचा कट रचला. डिसेंबर १९२८ मध्ये ही कामगिरी फत्ते करण्यात आली. आणि मग सर्वजण भूमिगत झाले. त्यावेळी राजगुरू यांनी गावोगावी जाऊन तरुणांना क्रांतीची मशाल हाती दिली.

पुढे ते पकडले गेले आणि त्यांना लाहोर कटातील सहभागी आरोपी म्हणून २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. त्यांच्यासह भगतसिंग व सुखदेव हेही देशासाठी शहीद झाले. म्हणूनच त्या तिघांच्या स्मृतीप्रित्यर्थ २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.

राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक फिरोजपूर (पंजाब) जिल्ह्यातील हुसेनीवाला येथे आहे. तर, आता त्यांच्या जन्मगावास त्यांचेच नाव देण्यात आलेले आहे. आताही राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू स्मारक समितीतर्फे सामाजिक काम चालू आहे. राजगुरू हे महान क्रांतिकारी होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यामुळेच आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या विचारी नेत्याची आठवण येते. १९३१ मध्ये इंग्रजांनी माफीनामा लिहून देऊन सुटका करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवल्याची नोंद इतिहासात आहे. मात्र, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी माफीनामा लिहिला नाही. उलट आपल्या कुटुंबियांना व महात्मा गांधी यांनाही असे करून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न न करण्याचे कळवले होते. विचारांशी बांधिलकी आणि आपल्या कर्तव्यावर विश्वास असलेले हे तीन शहीद म्हणूनच अजरामर झालेले आहेत.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

माहितीचे स्त्रोत : विकिपीडिया, विकासपिडिया, गुगल आदि.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here