श्रीगणेशाकडून शिका ‘या’ गुंतवणूक टिप्स; वाचा इन्व्हेस्टर बनण्यासाठी महत्वाची माहिती

बुद्धीदेवता म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका श्रीगणेश. याच गणेशाच्या उत्सवात सध्या अवघा महाराष्ट्र तल्लीन आहे. जीवनात सुख आणि समाधान मिळवण्यासाठी मजेत जगण्याचाच संदेश ही देवता आपल्या सर्वांना देते. तसेच त्यातून आपण इन्व्हेस्टर जगताशी जोडलेल्या काही गोष्टीही मस्तपैकी समजून घेऊ शकतो. याबाबत राहुल जैन (प्रमुख, एडलवाइज वेल्थ मैनेजमेंट) यांनी इकॉनॉमिक टाईम्स या आघाडीच्या दैनिकात महत्वाची माहिती असलेला लेख प्रसिद्ध केला आहे. त्याचेच हे स्वैर भाषांतर ‘कृषीरंग’च्या खास वाचकांसाठी..!

मोठे स्वप्न आणि समयसूचकता महत्वाची

गणपती म्हणजे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता. याच गणरायाच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे पाहून आपल्याला मोठे काहीतरी पाहिल्याचा फील येतोच ना? हत्तीचे तोंड असलेली ही देवता त्याचवेळी उंदीर हे वाहन असलेली आहे. एकूणच जीवनात छोटे आणि मोठे असे सगळेच समान असतात. प्रत्येकजण आपापल्या जागी मोठा असतोच की. त्याच पद्धतीने हत्तीचे मस्तक पाहून आपल्याला गणेशाविषयी प्रेम आणि आपुलकी वाटते. तशीच उंदीरमामा पाहूनही. तर, गुंतवणूक करतानाही आपण अशाच पद्धतीने कोणता शेअर मोठा आहे आणि कोणता छोटा याकडे अजिबात लक्ष देऊ नये.

कंपनी बेस्ट वाटली आणि तिचे व्यवस्थापन विश्वासार्ह आहे असे मनाला पटले की, मग अशाच स्क्रिप्टमध्ये गुंतवणूक करा. मार्चमध्ये मार्केट पडल्यावर अनेकांनी भीतीने शेअर विकले. तर काहींनी तेच पडेल किमतीचे शेअर खरेदी केले. ज्यांनी खरेदी केले त्यांना किमान सरासरी ४० टक्के इतका लाभ झालेला आहे. थांबा, पहा, अभ्यास करा आणि मगच निर्णय घेण्याचा हाच संदेश ही बुद्धीदेवता आपणास देते की..!

लक्षपूर्वक सर्व गोष्टी करा आणि पहा

श्रीगणेशाचे मस्तक मोठे असले तरीही त्यांचे डोळे छोटे आणि तीक्ष्ण असतात. त्यातूनही सर्व भक्तांना एक मस्त संदेश आहे. कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवा. चिंतेश्वर असलेले श्रीगणेश आपल्याला एकाग्र चित्ताने सर्व गोष्टी पाहून मगच निर्णय घेण्याचे सूचित करत असतात.

होय, शेअर बाजार असो किंवा इतर कोणत्याही सेक्टरमधील गुंतवणूक असो. त्यामध्ये उगीचच खालीवर झाले की चिंता करू नका. भविष्याचे आडाखे अभ्यास करून ठरावा आणि मगच निर्णय घ्या. सर्व निर्णय काही योग्य असतील असेच नाही. परंतु, भावनिक न होता स्थिर चित्ताने अशावेळी निर्णय घेऊन आपण नक्कीच मार्ग काढू शकतो.

योग्य पद्धतीने ऐका, आणि कशावरही विश्वास ठेऊ नका

हत्तीचे कान म्हणजे मोठे सुपासारखे कान. श्रीगणेशालाही असेच कान आहेत. ते आहेत चांगल्या पद्धतीने ऐकण्यासाठी. होय, शेअर बाजारात किंवा इतर सेक्टरमध्येही अफवांचे जोमदार पिक वेळोवेळी येत असते. अशावेळी आपली गुंतवणूक असलेल्या कंपनीची योग्य माहिती घ्या. सर्व काही ऐकून घ्या. मात्र, त्यानंतर आपल्या पद्धतीने त्याची माहिती घेऊनच निर्णय घ्या.

सध्या सोशल मीडियामध्ये इतर अफवांसह शेअर बाजारातील अफवाही पिकवल्या जातात. सल्लागार संस्था फोन करून आम्हीच पैसे कमावण्याचा राजमार्ग सांगत असल्याचा दावा करतात. मात्र, त्यांच्यावर १००% विश्वास टाकू नका. कारण, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था शेअर बाजारात इतक्या दिवसात एखादी स्क्रिप्ट इतकाच नफा किंवा तोटा देईल हे छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. अगदी सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वारन बफे किंवा राकेश झुनझुनवाला यांच्याकडील सर्वच शेअर नफा देतात किंवा देतीलच असे काहीही नाही.

गुंतवणूक करायला सल्ला घेण्यापेक्षा गुगल किंवा न्यूजपेपर यांच्या माहितीद्वारे निर्णय घ्या. सरकारी निर्णयामुळे बाजारावर होऊ शकणारे परिणाम लक्षात घेऊन भविष्याचे आडाखे पक्के करा. जर मध्येच एकदा निर्णय आलाच तर आपल्या जुन्या मतांशी ठाम न राहता नव्याने अभ्यास करून त्याबाबत निर्णय घ्या.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here