फ़क़्त थेट बातमी आणि स्पष्ट विचार; वाचा ‘टीम कृषीरंग’ची भूमिका

मागील चार वर्षांमध्ये ‘कृषीरंग’ हे तुमचे लाडके पोर्टल बनले. त्याचे सर्वस्वी श्रेय जाते, ते आमच्या चोखंदळ वाचकांना. कारण, आम्ही कितीही लेख लिहिल्या आणि बातम्या टाकल्या तरीही त्याला जर दाद देणारे वाचक नसतील तर, त्याचा कचरा होणार की. पण, तुम्ही सर्वांनी प्रेमळ भावनेने या ‘कृषीरंग’वर प्रेम केले. त्यातूनच आमच्या टीमला प्रेरणा मिळाली आणि तुमच्या हक्काचे असे हे व्यासपीठ लक्षावधी वाचकांच्या मनात रुजले.

दि. १ मे २०१७ ला शेती व ग्रामीण विकासाला वाहिलेले हे कृषी साक्षरता चळवळीचे मुखपत्र आम्ही सुरू केले. सुरुवातीला वाचक मिळणे तितके सोपे नव्हते. मात्र, त्या काळात आम्ही चाचपडत असताना अनेक चोखंदळ वाचकांनी साथ दिली. मध्ये आमच्याकडून काहीवेळा वेगळा मार्ग अनुसरला गेला. बाजारू अर्थव्यवस्था असलेल्या या जगात तागण्यासाठी आणि जगण्यासाठी अनेकदा आपल्याला वेगळा नकारात्मक मार्गही पत्करावा लागतो. मात्र, तुम्हा वाचकांच्या जीवावर आम्ही पुन्हा मार्गस्थ झालेलो आहोत. कारण, तुम्हीच आम्हाला थेट बातमी देणारा स्पष्ट विचार शिकवला आहे.

होय, वाचक मित्र-मैत्रिणींनो, आम्हाला अभिमान आहे की आमच्या वाचकांमध्ये महिलांचा टक्का ४७ इतका आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आम्ही लाइफस्टाइल, आरोग्य व पाककला याचेही काही लेख नियमितपणे देतो. तसेच पैसे कमावण्याची दिशा देणारे अर्थ आणि व्यवसाय यावरील लेखही द्यावे लागतात. शेती हा ‘कृषीरंग’चा कणा आहे. तोच ताठ ठेवण्यासाठी महिला आणि युवक-युवतींनी आम्हाला मोठी साथ दिली आहे. सध्या प्रतिदिन ८ लाखांपर्यंत वाचकसंख्या असलेले हे मराठी भाषेतील लोकप्रिय न्यूज आणि व्ह्यूज पोर्टल बनले आहे. आता आपल्याला याची व्याप्ती वाढवायची आणि दर्जाही टिकवायचा आहे. त्यासाठी आपण वाचकांनी आम्हाला असेच सहकार्य करावे, ही विनंती.

आपण अनेकदा फोन, मेसेज किंवा इमेलद्वारे आम्हाला मार्गदर्शक तत्वांची आठवण करून देता. नवीन विषय सुचवता आणि जनतेचे व्यासपीठ असलेल्या ‘कृषीरंग’वरील प्रेम व्यक्त करता. पुढील काळात आपला हाच ऑनलाईन घरोबा आणखी वाढणार आहे. शेती ही आतबट्ट्याची न राहता प्रॉफिटेबल कशी होईल त्यासाठीचा प्रयत्न म्हणजे हे पोर्टल आहे. कृषी आणि ग्रामीण विकासाचे रंग लक्षात घेऊन त्यास इंद्रधनुष्यमय रंगबेरंगी आणि सुंदर करण्याचा हा तुमचा-आमचा अन सर्वांचा प्रयत्न आहे.

पुढील काळात आपण पर्यावरण, आधुनिक शेती, कृषी प्रक्रिया, फ्युचर फार्मिंग, जीएम टेक्नोलॉजी, विषमुक्त शेती, शेतीचे राजकारण, अर्थकारण आणि सामाजिक संदर्भ यावर आणखी स्पष्टपणे बातम्या व लेख प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमचा आमच्यावर विश्वास आहे. तोच वृद्धिंगत करण्यासाठीचे व्रत आम्ही घेतले आहे. त्यामुळेच आम्ही उतणार नाही, मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही, याची काळजी आपण वाचकांनी घ्यावी.

गावाच्या समस्या, शेतीचे प्रश्न आणि इतर कोणत्याही माहितीसाठी आम्हाला लिहा. इमेलद्वारे, फेसबुक पेजद्वारे, ट्विटरवर किंवा मेसेजद्वारे आम्हाला सूचना द्या. मार्गदर्शन करा आणि आमच्या बातम्या व लेख शेअर करून कृषी साक्षरता चळवळीला हातभार लावण्याची विंनती आम्ही आपणास करीत आहोत. आपले प्रेम आहे. तेच आणखी वृद्धिंगत व्हावे आणि महाराष्ट्राच्या शेती-मातीची सेवा ‘टीम कृषीरंग’कडून घडावी यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या.

महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक, ग्रामीण विकास, कृषीपूरक व्यवसाय आणि अर्थजगत याची माहिती देणारे नवे सदर आपल्या भेटीला येत राहतील. त्यामध्ये आणखीही काही विषय यावेत असे वाटले तर आम्हाला प्रतिक्रिया द्या. आम्ही तुमच्या सूचनांचे नक्कीच पालन करू. कारण, तुम्ही वाचक मित्र-मैत्रिणीच आमचे मार्गदर्शक आहात. गुरूही आपणच आहात. शेती-मातीच्या बातम्या आणि लेख लिहिण्यासाठी तज्ञांनीही या ‘कृषीरंग’ नामक कृषी साक्षरतेच्या यज्ञात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

बाकी, शेवटी इतकेच साकडे तुम्हा वाचकांना की लोभ आहेच, प्रेम आहेच.. ते आणखी वाढवण्यासाठीची संधी आपण आम्हाला द्यावी.. सेवेची संधी द्यावी..!

धन्यवाद..!

@ टीम कृषीरंग

krushirang@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here