विषमुक्त शेतमाल विक्रीतून आर्थिक प्रगती; वाचा प्रयोगशील ‘वीर’ भावांची गोष्ट

शेती हा आतबट्ट्याचाचा व्यवसाय. हेच म्हटले जाते. त्यात काही चूक आहे असेही नाही. मात्र, शेतीला कष्टासह डोक्यालिटीची जोड दिली तर हा व्यवसायही श्रीमंती दाखवतोच की.. होय, हा काही नियम नाही शेतीच्या प्रगतीचा मात्र, अपवाद आहेच की असले काही. आज अशाच अपवादात्मक पद्धतीने शेती करणाऱ्या भावंडांची गोष्ट आपण पाहणार आहोत. त्यांचे आडनाव वीर आहे. हो, ते आहेतही असेच वीर. कारण त्यांनी शेतीमध्ये आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.

लेखक : गणेश शिंदे (सरकार)

ही गोष्ट आहे सालवडगाव (ता. नेवासा, जि. अहमदनगर) येथील संतोष पंढरीनाथ वीर व काकासाहेब पंढरीनाथ वीर या दोघा भावांची. सेंद्रीय भाजीपाला उत्पादन आणि त्याची स्थानिक भागात विक्री हे त्यांचे बिजनेस मॉडेल आहे. होय, बिजनेस मॉडेलच म्हणावे लागेल. कारण, ते शेती पिकवत नाहीत, तर त्यातला उत्पादित माल रास्त भावामध्ये विकातातही. करोनाच्या लॉकडाऊन कालावधीत त्यांच्या उत्पादित शेतमालाची मागणी आणखी वेगाने वाढली आहे. एका अर्थाने शेती आणि ग्राहकांना सेवा या दोन्हींचा सुरेख संगम राखून या भावंडांनी शेती फुलवली आहे. आता भविष्यात याचे एक स्ट्रक्चरल मॉडेल डेव्हलप करण्याचेही त्यांचे नियोजन आहे. तसेच फळबागांचेही नियोजन केले जात आहे.

आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे काही त्यांचे स्वप्न नाही. वेगळ्या पद्धतीने वाट धरून आर्थिक उन्नती मात्र त्यांना साधायची आहे. त्यातूनच त्यांचे हे बिजनेस मॉडेल उभे राहिले आहे. आता त्यांनी स्थानिक परिसरात त्याच जोरावर आपली वेगळी ओळख निर्माणही केली आहे. सेंद्रीय व रासायनिक कीटकनाशक अवशेषमुक्त (विषमुक्त अर्थात रेसिडू फ्री) भाजीपाल्याचे ते दोघेजण उत्पादन घेतात. शेजारच्या शेवगाव या तालुक्याच्या गावात ते आपला भाजीपाला विकतात. अगदी त्याचा भाव फिक्स आहे आणि ग्राहकही.

ग्राहकांच्या मागणीनुसार पिकाच्या लागवडीचे नियोजन केले जाते. त्यानुसार ते आपल्याच शेतात चक्राकार पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करतात. ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य अशी बास्केट बनवून मग ती घरपोहोच दिली जाते. शेवगाव भाग म्हणजे दुष्काळी पट्टा. नगर जिल्ह्यातील अवर्षणप्रवण भाग आणि मराठवाड्याच्या लगतच्या या भागात त्यांनी शेती आणि हे बिजनेस मॉडेल फुलवले आहे. त्यांच्या परिसरातही पाण्याची टंचाई पाचवीलाच पुजलेली. संतोष आणि काकासाहेब वीर या दोघा भावांनी त्यावर मात करण्यासाठी सेंद्रीय शेतीतून विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन सुरु केले आणि ते यशस्वीही झाले आहेत.

वडिलोपार्जीत ६ एकर शेतीमध्ये त्यांनी हे मॉडेल डेव्हलप केले आहे. संतोष यांचे शिक्षण बारावी तर, काकासाहेब आहेत अल्पशिक्षित. मात्र, पुस्तकी शिक्षण नाही, तर व्यावहारिक शिक्षण किती आवश्यक आहे हेच त्यांनी या प्रयोगातून दाखवून दिले आहे. तूर, बाजरी, ज्वारी, हरभरा या पारंपारिक पिकांना फाटा देत नैसर्गिक शेती तंत्राचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभ्यास करुन त्यांनी हे यश मिळवले आहे. चक्राकार पद्धतीने त्यांनी वांगी, दोडका, मिरची, भेंडी, कारली, दुधीभोपळा कोबी, फ्लावर, टोमॅटो, कारली, घोसाळे, शेपू, अंबाडी, कोथिंबीर, पालक, मेथी, काकडी, मुळा ही भाजीपाला पिके घेण्याचे नियोजन केलेले आहे.

शेतीच्या ट्रिक्स :

  1. वेलवर्गिय भाजीपाला शेताच्या कडेला आणि इतर भाजीपाला पिके बेडवर लागवड केली जातात.
  2. ४ फुट अंतराचे बेड २ बाय १ या पद्धतीने लागवड केल्याने गरजेनुसार भाजीपाला उपलब्ध होतो.
  3. मालाचा दर्जा आणि कीपिंग क्वालिटी उत्तम असल्याने ग्राहक जोडून राहतात.
  4. मल्चिंग पेपर नाही, तर गहू, बाजरीचे कणीस किंवा भुसा आणि पालापाचोळ्याचे अच्छादन केल्याने पाणी कमी लागते.
  5. शेणखत आणि जैविक निविष्ठा व घटकांचा वापर केला जातो.

 शेतातील पालापाचोळा, पिकाचे अवशेष, शेणखत, जीवामृत, दशपर्णी अर्क, कडुनिंबाचा अर्क असलेले घटक व कंपन्यांची जैविक कीडनाशके याचाच वापर यामध्ये केला जातो.एकरी १५ ते २० बैलगाड्या शेणखतटाकले जाते. त्यामुळे सेंद्रिय कर्ब उत्तम राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here