मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी मीरपूर येथे होणार आहे. पहिला सामना जिंकून बांगलादेश मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत दुसरा वनडे सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात टीम इंडिया हरली तर मालिकाही त्यांच्या हातातून निघून जाईल आणि बांगलादेश भारताकडून त्यांच्या घरच्या मैदानावर सलग दुसरी मालिका जिंकेल. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमनासाठी पूर्ण ताकद लावेल.
दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शिखर धवनने हे स्पष्ट केले. तो म्हणाला की, भारतीय संघ मालिकेतील पहिला सामना हरण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम्ही याआधी अशा परिस्थितीचा सामना केला आहे आणि आम्हाला कसे परत यायचे हे माहित आहे.
शिखर धवन म्हणाला, ‘टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही गमावलेला शेवटचा सामनाही कमी धावसंख्येचा होता. यामध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली. आम्ही आमच्या चुकांचा आढावा घेतला असून दुसऱ्या वनडेत भारतीय संघ नक्कीच पुनरागमन करेल.
शार्दुल निवडीसाठी उपलब्ध आहे: धवन
शार्दुल ठाकूरला गेल्या सामन्यात दुखापत झाल्याने तो दुसरा एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, धवनने आनंदाची बातमी दिली आहे. पत्रकार परिषदेत शार्दुलच्या दुखापतीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, शार्दुल तंदुरुस्त असून दुसऱ्या वनडेत निवडीसाठी उपलब्ध आहे. त्याला स्नायूंचा सौम्य ताण होता. दुसरी कोणतीही दुखापत नाही.
धवनने विश्वचषकाची तयारी सुरू केली
पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर रिव्हर्स स्वीप खेळताना बोल्ड झाला. मात्र, दुसऱ्या सामन्याआधीच तो नेटमध्ये स्वीप आणि रिव्हर्स स्वीप शॉट्सचा सराव करताना दिसला. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरही नेटमध्ये स्वीप शॉट खेळण्याचा सराव करत होता. याबाबत धवनला विचारले असता तो म्हणाला की, मला स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळायला आवडते. बांगलादेशच्या विकेटवर असे फटके उपयोगी पडतात. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. भारतीय विकेटवर फिरकी गोलंदाजांची भूमिकाही महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत स्वीप शॉट खूप प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे मी नेटमध्ये स्वीप शॉट खेळण्याचा सराव करत आहे. एकप्रकारे हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग आहे.
- हेही वाचा:
- ऋषभ पंत ‘या’ कारणामुळे बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेतून बाहेर; का घेतला BCCI ने हा निर्णय जाणून घ्या सविस्तर या वृत्ताद्वारे
- भारताने सामना गोलंदाजीने नव्हे तर क्षेत्ररक्षणाने गमावला; ‘या’ खेळाडूनेही ओढले भारतीय संघावर ताशेरे