मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळवला जात आहे. किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या तर कर्णधार शिखर धवनने 72 धावांचे योगदान दिले. युवा सलामीवीर शुभमन गिल 65 चेंडूत 50 धावा करून बाद झाला.
न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टिम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी तीन बळी घेतले. या सामन्याद्वारे वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत, तर संजू सॅमसनलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. यादरम्यान धवनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 12 हजार धावाही पूर्ण केल्या. तो सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
यष्टिरक्षक-ओपनर डेव्हॉन कॉनवे आणि फिन ऍलन या जोडीने न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. दोन्हीही खेळाडू चांगली खेळी करत असतानाच शार्दुल ठाकूरने भारताला पहिले यश मिळवून दिले. डावाच्या आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शार्दुलने फिन अॅलनला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. अॅलन 25 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. ऍलन आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. कर्णधार केन विल्यमसन यष्टिरक्षक डेव्हन कॉनवेला साथ देण्यासाठी आला आहे. न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 1 गडी गमावत 42 धावा केल्या आहेत.
- हेही वाचा:
- शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या धडाकेबाज खेळीने भारताचे न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य; पहा सविस्तर वृत्त
- शुभमन गिल चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये पदार्पणाच्या वनडेत ठरला होता अपयशी; आजच्या सामन्यात केली कसर पूर्ण