मुंबई: क्रिकेटचा ‘देव’ सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग कठीण काळात टीम इंडियाला साथ देताना दिसत आहेत. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 10 विकेटने पराभूत झाल्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनीवर जोरदार टीका होत आहे. 15 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला होता, पण त्याचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला.
टीम इंडियाच्या पराभवानंतर दिग्गज सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाचे समर्थन केले आहे. सचिनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘एका नाण्याला दोन बाजू असतात. जीवनाचेही तसेच आहे. संघाचा विजय हा आपलाच विजय म्हणून साजरा करत असू, तर संघाच्या पराभवाचेही तेच करायला हवे. आपण त्यांचा स्वीकार केला पाहिजे. आयुष्यात दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 168 धावा केल्या. चार षटके शिल्लक असताना इंग्लंडने कोणतेही नुकसान न करता लक्ष्याचा पाठलाग केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि सलामीवीर अॅलेक्स हेल्स यांनी धडाकेबाज अर्धशतक ठोकले.
युवराजने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘होय, जेव्हाही आमचा संघ मैदानात उतरतो तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळी आमचा संघ जिंकलेला पाहायचा असतो. पण हे मान्य करावे लागेल की असे काही दिवस येतील जेव्हा आपल्याला आपल्या प्रमाणे निकाल मिळणार नाहीत. संपूर्ण स्पर्धेत संघ ज्या प्रकारे एकजुटीने खेळला त्याचा मला अभिमान आहे. आता आपण पुढे जाऊन आणखी चांगली कामगिरी कशी करू शकतो आणि मजबूत पुनरागमन कसे करू शकतो हे पाहण्याची वेळ आली आहे. भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर असताना सुपर 12 मध्ये 5 पैकी 4 सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022: उपांत्य फेरीत इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय; बटलर आणि हेल्सने केली तगडी खेळी
- ICC T20 World Cup 2022: विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; जाणून घ्या कोणता आहे हा विक्रम