मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दादरमधील शिवाजी पार्क पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या या पत्राच्या विषयामध्ये राहुल गांधी आणि नाना पटोले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्रातील मजकूर जसाच्या तसा खालीलप्रमाणे…
मी रणजित विक्रम सावरकर वय ५२ राहणार कमलकुंज, शिवसेना भवन पथ दादर (प) मुंबई ४०००२८ खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करु इच्छितो.
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशीम येथे जारी सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली असे खोटे विधान करुन त्यांची बदनामी केली आहे. या शिवाय सावरकर ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते आणि त्यांच्या आदेशानुसार भारताविरुद्ध काम करीत होते अशी धादांत खोटी विधाने करत सावरकरांसारख्या थोर राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी विनंती करत आहे.
ही बातमी मी माझ्या दादर येथील निवासस्थानी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पाहिली. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी देखील आज सकाळी (दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी) असेच वक्तव्य करुन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला. हे वृत्त मी दूरदर्शनवर पाहिले.
माझे निवासस्थान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने ही तक्रार आपल्याकडे नोंदवत आहे. तरी आपण राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती.
must read