जळगाव :
टाटा म्हणजे शुद्धतेचे प्रतिक, अशीच भारतीयांची धारणा आहे. त्यामुळे या कंपनीच्या टाटा मिठाला मोठी मागणी आहे. बाजारात तुलनेने जास्त भाव असूनही शुद्धतेमुळे या मिठाला असलेली मागणी लक्षात घेऊन याच्याच बनावट मीठ विक्रीचे रॅकेट जामनेर येथे सक्रीय होते.
मुंबईच्या इन्व्हेस्टिगेशन कंपनीने जामनेर येथील बजरंगपुरा भागातील राजकुमार कावडिया यांच्या मयूर किराणा दुकानात छापा टाकून १४ लाख रुपये किमतीचा १४०० गोण्या टाटा मिठाचा बनावट साठा जप्त केला आहे. हे बनावट मीठ इंदूरहून आल्याचा इन्व्हेस्टिगेशन कंपनीला संशय आहे.
टाटा कंपनीचे बनावट टाटा मिठ विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून कंपनीने बनावट मालावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या मुंबई येथील आय.पी. इन्व्हेस्टिगेशन प्रायव्हेट लिमिटेडला माहिती दिली. त्यावरून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
टाटा कंपनीच्या एक किलो पॅकिंगसारखेच परंतु बनावट पॅकिंग असलेल्या पिशव्या विकल्या जात आहेत. या एका गोणीत ५० पिशव्या असतात. क्यूआर कोड व प्रिंटिंगमधील रंगाचा फरक यामधील बदल लक्षात आल्याने ही पॅकिंग बनावट असल्याचे उघड झाले. हा साठा मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथून आल्याचा संशय आहे.
२० रुपये किमत असलेले हे पॅकिंग कंपनीने सप्टेंबरमध्ये बंद करून २१ रुपये किलोचे पॅकिंग बाजारात आणले आहे. तरीही तेच मिळत असल्याचे लक्षात आल्याने संशय वाढला आणि मग हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
संपादन : माधुरी चोभे