मुंबई: T20 विश्वचषक 2022 दिनेश कार्तिकसाठी खास राहिला नाही. या यष्टिरक्षक फलंदाजाकडून टीम इंडियाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. विश्वचषकापूर्वीच कार्तिकसाठी हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो, असे बोलले जात होते. कार्तिकनेही बुधवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याचे संकेत दिले आहेत. आपण निवृत्ती घेत असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले नाही पण त्याच्या पोस्टवरून चाहत्यांना हेच वाटतआहे.
विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. तरी त्याची बॅट चालली नाही. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सेमीफायनल सामन्यात त्याच्या जागी ऋषभ पंतला स्थान देण्यात आले. कार्तिक 37 वर्षांचा आहे आणि आता तो पुढच्या विश्वचषकात खेळेल अशी आशा कमी आहे. कार्तिकनेही निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
कार्तिकने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे
कार्तिकने व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्याच्या टीमच्या खेळाडूंसोबत, कुटुंबासोबत आणि मैदानावर खेळतानाचे फोटो आहेत. दिनेश कार्तिकने इंस्टाग्राम पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले- ड्रीम डू कम ट्रू (स्वप्न खरे होतात), टी-20 वर्ल्ड कप. विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असणे ही अभिमानाची बाब आहे. आम्ही स्पर्धा जिंकू शकलो नसलो तरी आठवणी मला नेहमीच आनंदित करतील. मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, मित्र आणि चाहत्यांचे मी आभार मानू इच्छितो.
कार्तिकची कारकीर्द आहे जवळपास दोन दशकांची
दिनेश कार्तिकने 2004 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. 2007 मध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेतही तो टीम इंडियाचा भाग होता. धोनी असताना त्याला भारतीय संघात फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांत तो संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तो प्रथम संघाचा भाग बनला आणि त्यानंतर त्याला गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेतही संधी मिळाली. कार्तिक आता दोन्ही मुलांचा पिता आहे आणि त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. अशा परिस्थितीत ते लवकरच निवृत्तीची अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता आहे.
- हेही वाचा:
- ICC T20 World Cup 2022 Harbhajan Singh: कार्तिकच्या खराब फॉर्मच्या बहाण्याने ‘या’ क्रिकेटरने केले भाष्य; पहा काय म्हणाला हा क्रिकेटर
- संजू सॅमसनसोबत हे काय होतंय? न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतरही पुढील होणाऱ्या मालिकांमध्ये खेळण्याबाबत सांशकता, जाणून घ्या सविस्तर वृत्त