मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला आज 25 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. अनुभवी खेळाडू शिखर धवन वनडे मालिकेचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून सलामीला आलेली कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांची जोडी कमाल करताना दिसत होती मात्र 50 धावा करताच शुभमन गिल फर्ग्यूसन च्या गोलंदाजीवर कॉनवेच्या हाती झेल देत झेलबाद झाला. त्यानंतर भारताला आणखी एक धक्का शिखर धवनच्या रुपात बसला. तोही 77 धावा करून  एलेनच्या हाती  झेल देत आउट झाला.

भारतीय संघाला ऋषभ पंतच्या रूपाने तिसरा धक्का बसला आहे. 23 चेंडूत 15 धावा करून पंतला लॉकी फर्ग्युसनने बोल्ड केले. सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता पण त्यानेही आज म्हणावा तसा खेळ दाखवला नाही. तोही अवघ्या 4 धावा करून फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर एलेनच्या हाती झेल देत झेलबाद झाला.

लॉकी फर्ग्युसनने चार चेंडूत भारताला दोन धक्के दिल्याने भारताला आता सांभाळून खेळी करावी लागणार आहे. आता संजू सॅमसन फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून श्रेयस अय्यरला तो साथ देताना दिसत आहे. भारताच्या 38 षटकात 4 गडी गमावत 190 धावा झाल्या असून श्रेयस अय्यर 33 धावा तर सैमसनच्या 14 धावा होत दोघे नाबाद खेळी करत आहेत.

Share.

Leave A Reply

Exit mobile version